β शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा

Balasaheb Thackray
Balasaheb Thackray

शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे एक अतूट असे नाते आहे. दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचे एक प्रकारे अधिवेशनच होय! दरवर्षी न चुकता होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. कारण या मेळाव्यात शिवसेनेची दिशा स्पष्ट होत असते. यंदाचा दसरा मेळावाही तसा खासच म्हणावा लागेल. 

आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच मुखपत्रात आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे विरोधकांनी केलेली टीका याचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसा घेतात याकडेच आता सर्वच पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे शिवसैनिकांसह इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. 

काही दिवसांपूर्वी खासदार किरीट सोमय्या यांनीही पक्षाचे मनसुबे स्पष्ट केले. काहीही करून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची अशी व्यूहरचना भाजपने केली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे 1997 पासून सत्ता आहे. मुंबई ही शिवसेनेची संजीवनी आहे. त्यामुळे महापालिकेवरील सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनाही तयार आहे. त्यादृष्टीने यंदाचा दसरा मेळावा महत्त्वपूर्ण आहे. याच मेळाव्यात उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिकांमध्ये कशाप्रकारे चैतन्य निर्माण करतात याकडे माध्यमांचेही लक्ष आहे. 

कोपर्डी घटनेनंतर गेल्या काही महिन्यात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले. मोर्चाच्या मागण्याही स्पष्ट आहेत. त्यास शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. परंतु, मुखपत्रात आलेले व्यंगचित्र वादग्रस्त ठरले. त्यामुळे मराठा समाजात नाराजी निर्माण झाली. विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. परंतु, विरोधकांनी त्यानंतरही टीका सुरूच ठेवली. त्यांना उद्धव ठाकरे कशाप्रकारे उत्तर देतात, कोणत्या नेत्यांचा ते समाचार घेतात याकडेही शिवसैनिकांसह साऱ्यांचेच लक्ष आहे. 

दसरा मेळाव्याचे महत्त्व 
शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत दसरा मेळाव्याला फार महत्त्व आहे. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 मध्ये झाली. त्यानंतर पहिला दसरा मेळावा 30 ऑक्‍टोबर 1966 रोजी झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमोघ वाणीने साऱ्या मराठी समाजात एक स्फुल्लिंग चेतविले गेले. तेव्हापासून आजतागायत शिवसेना आणि दसरा मेळावा असे अतूट नाते तयार झाले आहे. या काळात केवळ तीनवेळा दसरा मेळावा होऊ शकला नाही. या मेळाव्यावर अनेकदा या ना त्या कारणाने निर्बंध आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो हाणून पाडत मेळावे पार पडले. 

दसरा मेळाव्यात राज्यभरातून शिवसैनिक वाजतगाजत व शिस्तीने शिवाजी पार्कवर जमतात. 44 वर्षे एकच मैदान, एक वक्ता असा विक्रम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आहे. त्यांचे स्फोटक विचार, भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर येत असत. याच मेळाव्यातून त्यांनी देश हादरवणारी वक्तव्ये केली. महाराष्ट्राचा राजकीय भूगोल त्यांनी याच माध्यमातून बदलला. त्यामुळे या मेळाव्यास एक राजकीय परिमाणही आहे. एका राजकीय पक्षाचे दरवर्षी न चुकता होणारे संमेलन असेही या मेळाव्यास म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या देहावसनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सन 2013 पासून मेळावा होत आहे. यंदाचा मेळावा त्यांच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असाच आहे. त्यामुळेच वाघाच्या डरकाळीकडे साऱ्या राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com