हायटेक सिटीची सुरक्षा रामभरोसे

हायटेक सिटीची सुरक्षा रामभरोसे

कोपरखैरणे -  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईप्रमाणेच नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यांचा उपयोग गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना होत होता. परंतु आता शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद आहेत. सीसी टीव्हीच्या कंत्राटदाराला बिलाचे पैसे दिले नसल्यामुळे त्याने ही सेवा बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता हायटेक सिटीची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.

संवेदनशील ठिकाणे
एपीएमसी, आरबीआय, कोकण भवन, सिडको भवन, नवी मुंबई महापालिका मुख्यालय, वाशी आणि बेलापूर रेल्वेस्थानक, सीजीओ कॉम्प्लेक्‍स, स्टेट बॅंकेचे सर्व्हर.

आरटीओची कारवाई थांबली
नवी मुंबईत सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, पाम बीच मार्ग, ऐरोली-मुलुंड असे महत्त्वाचे रस्ते आणि चौक आहेत. तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची आणि गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळते. शहरातील अनेक गुन्ह्यांची उकल याच सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने झाली आहे. चौकातील सीसी टीव्हीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंडवसुली केली जात होती. परंतु ही कारवाई आठवडाभरापासून बंद आहे. 

शहरातील महत्त्वाचे रस्ते
नवी मुंबई हे मुंबई व उर्वरित महाराष्ट्राला जोडणारे शहर आणि मुंबईचे प्रवेशद्वार आहे. नवी मुंबईतील फायझर रोड किंवा महापे-शीळ फाटा हा नाशिक म्हणजेच उत्तर महाराष्ट्राला जोडणारा मार्ग आहे. ठाणे-पनवेल हा ठाणे व मुंबई उपनगरांना जोडणारा मार्ग आहे. सायन-पनवेल महामार्ग पुढे उर्वरित महाराष्ट्र व कोकण आणि गोव्याला जोडणारा मार्ग आहे.

सागरी किनारा, जेएनपीटी
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ओएनजीसी, जेएनपीटी, घारापुरी लेणी, सुमारे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त सागरी किनारा, रायगड भवन, एमआयडीसी अशी एक ना अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. असे असले तरी नियोजित शहर आणि तीन हजार कोटींचे बजेट असलेली महापालिका सीसी टीव्हीचे वर्षाचे सुमारे ६० लाखांचे बिल देत नसल्यामुळे ते बंद केले जातात ही धक्कादायक बाब आहे.

सीसी टीव्ही बंद असलेली ठिकाणे
वाशी उड्डाणपूल, सानपाडा रेल्वेस्थानक, तुर्भे सिग्नल, वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरंजा चौक, तीनटाकी चौक, एपीएमसी मुख्य चौक, एनआरआय कॉम्प्लेक्‍स, नवी मुंबई पालिका मुख्यालयासमोरील उरण चौक, सिडको भवन, कोकण भवन.

२६३ सीसी टीव्ही कॅमेरे
नवी मुंबई शहरात एकूण २६३ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. आणखी १५० बसवण्यात येणार आहेत. परंतु आता आहेत तेच बंद पडल्यामुळे पुढे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

भुरट्यांचे फावले
शहराच्या संवेदनशील ठिकाणची सुरक्षा व्यवस्था असली, तरी सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, दरोडा अशा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे भुरट्या चोरांचे फावले आहे. यापूर्वीही पैसे न मिळाल्याने शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे काही दिवस बंद होते. या वेळीही शनिवारपासून (ता. ८) शहरातील ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त सीसी टीव्ही बंद असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

शहरातील सीसी टीव्ही माझ्या माहितीनुसार बंद नाहीत. तरीही माहिती घेऊन योग्य ती पावले उचलण्यात येतील. सीसी टीव्हीचे देयक स्थायी समितीने मंजूर केले आहे.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 

काही आठवड्यांपासून शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-चलन देता येत नाही.
- नितीन पवार, उपायुक्त (वाहतूक).
 
शहरातील अनेक सीसी टीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत संबंधित विभागाला कळवले आहे. लवकरात लवकर ही समस्या सुटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप सावंत, उपायुक्त, गुन्हे शाखा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com