फेरीवाल्यांसमोर रेल्वे झाली हतबल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - रेल्वे परिसरात ठाण मांडलेल्या फेरीवाल्यांसमोर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) हतबल झाले आहे. फेरीवाल्यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे आरपीएफच्या आवाक्‍याबाहेरचे आहे, अशी कबुली महासंचालक उदय शुक्‍ला यांनी दिली. फेरीवाला धोरणाकरता रेल्वे प्रशासन महापालिकेशी सतत पत्रव्यवहार करत आहे.

रेल्वेच्या हद्दीत बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांच्या तक्रारी आल्यावर किंवा वरिष्ठ अधिकारी आल्यावर तात्पुरती दंडात्मक कारवाई होते.

फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना आरपीएफला मर्यादा येतात. एकदा पकडल्यास एक हजार आणि पुन्हा पकडल्यास दोन हजारांपर्यंत दंड केला जातो. फेरीवाल्यांना पकडून न्यायालयात हजर केले जाते. त्यांच्याकडून दंड घेतला जातो. न्यायालयात फेरीवाले आरपीएफच्या विरोधात खोटे आरोप करतात. त्यामुळे फेरीवाल्यांना आवरणे शक्‍य होत नाही.

लोकलमध्ये सीसी टीव्ही
महिलांच्या सुरक्षेचा विचार करून मार्चअखेर पश्‍चिम रेल्वेच्या 21 लोकलमधील महिलांच्या 50 डब्यांत सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण होईल. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस आणि लोकलमध्येही लोकल तयार करतानाच सीसी टीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. मध्य रेल्वेप्रमाणेच पश्‍चिम रेल्वेकरता केंद्रीय देखरेख प्रणाली उभारली जाईल. त्याकरता मुंबईतील सात स्थानकांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी 20 कोटींचा खर्च येणार असल्याचे शुक्‍ला यांनी स्पष्ट केले. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली व विरार स्थानकात 500 हून अधिक कॅमेरे लावले जातील. या यंत्रणेवर मुंबई सेंट्रल येथील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाईल, असे शुक्‍ला यांनी सांगितले.

Web Title: hockers on railway station