बॅंका हाऊसफुल्ल

बॅंका हाऊसफुल्ल

मुंबई - बुधवारी खिशात पैसे असूनही सामान्य नागरिकांसमोर अभूतपूर्व पेचप्रसंग उभा राहिल्यानंतर गुरुवारी (ता. 11) बॅंकांमधील पैसे काढण्यासाठी आणि आपल्या जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली. परिणामी अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागले. प्रथमच खातेदारांनी बॅंका हाऊसफुल्ल झाल्या होत्या आणि पोलिस बंदोबस्तात व्यवहार पार पडल्याचे चित्र दिसले.

गुरुवारीही एटीएम यंत्रे बंदच राहणार असल्याने नागरिक बॅंकांमध्येच गर्दी करणार, हे ठरलेलेच होते. बुधवारचा दिवस कोरडाच गेल्याने आज काही केल्या पैसे मिळालेच पाहिजेत, असे ठरवून बॅंका सुरू होण्यापूर्वी तासभर आधी खातेदारांनी रांगा लावल्या. बॅंकांची दारे उघडताच काही वेळेतच त्या ग्राहकांनी भरून गेल्या. अनेक ठिकाणी मर्यादित खातेदारांनाच आत प्रवेश मिळत होता. मात्र, लांबच लांब रांगा लागल्याने अनेकांना उन्हात रस्त्यावर उभे राहावे लागले. ग्राहकांना आत घेऊन वळसे घेत रांगा लावण्यात आल्या. अशा स्थितीत अनेक ठिकाणी वादावादी होत होती. मुंबईत काही वर्षांपूर्वी म्हाडाच्या घरांचे अर्ज बॅंकांमार्फत दिले किंवा स्वीकारले जात होते. तेव्हा अशी गर्दी व रांगा पाहायला मिळत होत्या. तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी आज पाहायला मिळाली.


बॅंकांनी नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर आधीच कामकाज सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अनेक ठिकाणी बॅंका नेहमीप्रमाणेच सुरू झाल्या. नागरिकांना त्वरेने पैसे देण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत होते. तरीही अर्ज भरणे, झेरॉक्‍स काढणे आदी कामांसाठी वेळ लागत होता. तुटपुंजे का होईना; पैसे मिळाल्यावर विशेषतः ज्येष्ठ नागरिक व गृहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. जुन्या नोटा खात्यात भरल्यावर अनेक जण समाधानाचा सुस्कारा सोडत होते. काही बॅंकांच्या लहान शाखांमध्ये एरवी ग्राहकांची फारशी गर्दी नसते. तिथेही शे-दोनशे खातेदार रांगेत उभे होते. काही ठिकाणी आलेली कॅश थोड्याच वेळात संपल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिथे पुन्हा रोख रक्कम मागविण्याची वेळ आली.

पोस्टातही गर्दीच गर्दी
बॅंकेत गर्दी होणार हे जाणून काही खातेदारांनी आपला मोर्चा पोस्ट कार्यालयांकडे वळवला; परंतु तिथेही तशीच परिस्थिती होती. बॅंकेत व पोस्टात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. तरीही त्यांचे हाल झालेच. आपल्या जुन्या नोटा संपविण्यासाठी त्या खात्यात भरणे किंवा मनिऑर्डर करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. काम फत्ते झालेले नागरिक विजयी मुद्रेने बाहेर पडताना आपले अनुभव रांगेतील इतरांना रंगवून सांगत होते. बॅंकांमधून व पोस्टामधून शंभर-पन्नास रुपयांच्या जुन्या व मळकट नोटा मिळाल्याने काहींची निराशा झाली. ज्यांना पाचशे व दोन हजारच्या नवीन नोटा मिळाल्या ते अभिमानाने त्या सर्वांना दाखवीत होते. अर्थात नवीन नोटा मिळाल्या तरी बाजारात सुटे मिळतील का, याची चिंताही त्यांना होतीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com