ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास वीज-पाणी बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सोसायट्यांना मुंबई महापालिकेची नोटीस

सोसायट्यांना मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई - मुंबईतील 20 हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलांना ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र, दोन महिने उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील निम्म्याहून अधिक संकुले आणि सोसायट्यांना पालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. तरीही अंमलबजावणी न झाल्यास सोसायट्या आणि संकुलांचे वीज व पाणी कापण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आदेश पालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना दिले आहेत. त्यासाठी काही योजनाही आखल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील 20 हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक संकुलांना ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी तसा आदेश दिला होता; मात्र दोन महिन्यांत निम्म्याहून अधिक सोसायट्यांनी पालिकेचा आदेश धाब्यावर बसवत दुर्लक्ष केले. पालिकेने याबाबत नुकताच आढावा घेऊन अशा सोसायट्यांना नोटिसा बजावण्यास सुरवात केली आहे. मुंबईतील ज्या सोसायट्या व व्यावसायिक संकुले कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करतील, त्यांना नोटीस पाठवून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर ठरावीक मुदत देऊन प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले जाईल. तरीही अंमलबजावणी न झाल्यास वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.