सोशल मीडिया पडला महागात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोशल मीडियावर बेकायदा प्रचार करणाऱ्यांत उल्हासनगरमधील सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे... 

उल्हासनगर  - राज्य निवडणूक आयोगाची परवानगी न घेता उल्हासनगरमधील उमेदवार व राजकीय नेते सर्रास आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन सोशल मीडियावर करत आहेत. बेकायदा प्रचारप्रकरणी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आचारसंहिता विभागप्रमुख विजया जाधव यांनी असा प्रचार करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या मंडळींचा समावेश आहे. 

मुळात निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर, आचारसंहिता विभागप्रमुख विजया जाधव यांनी उमेदवार, राजकीय पक्ष यांना राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्याशिवाय सोशल मीडियावर प्रचार आचारसंहितेचा भंग होईल, अशी समज दिली होती. त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे जाहीर पत्रके, जाहिरातींद्वारे आवाहन केले होते. त्यानंतरही प्रचार सुरू ठेवणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली. 

यूडीएचे ओमी कलानी, भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, जया माखिजा, रिपब्लिकनचे नाना पवार व त्यांची पत्नी, तसेच उपमहापौर पंचशीला पवार, शिवसेनेचे बलबीर सिंग, प्रेरणा आहुजा, मोहिनी भोईर, गणेश शिंगाडे, सुरेश पाटील, मंगला पाटील, हरी कनोजिया, सुगंध पगारे, पूजा गोपलानी, राजकुमार चैनानी, रमेश चव्हाण, ज्योती माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कदम, विशाल कांबळे, नेहा बाविस्कर, मंगला ताटावडेकर, कुसुम कारभारी गोडसे, दिलीप थोरात, साई पक्षाचे मोहन गारो, दिलीप जग्यासी, अनिता त्रिलोकानी, भावना छाब्रिया, सुनील गंगवाणी, कॉंग्रेसच्या जया साधवानी, सुनीता अढांगळे, मोहन साधवानी, कुलदीपसिंग अलसिंघानी यांचा समावेश आहे. 

आमच्या पथकाने संबंधित उमेदवार, राजकीय नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी आचारसंहिता भंग केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. 
-विजया जाधव 

असा होतोय प्रचार 
उल्हासनगरमध्ये विविध परिसरातील उमेदवारांच्या हितचिंतकांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत. त्यात मित्र मंडळी, समर्थकांचा समावेश आहे. ठरावीक उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन त्यावरून केले जात आहे. तसेच उमेदवार दारोदारी जाताना, मतदारांशी बोलतानाची छायाचित्रे व्हायरल केली जात आहेत.

Web Title: illegal promotion on Social media