'डब्ल्यूएचओ'ने आदिवासी भागात लसीकरण मोहीम राबवावी - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागातील मुलांच्या आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुढाकार घेऊन लसीकरण मोहीम राबवावी, अशी विनंती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागातील मुलांच्या आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुढाकार घेऊन लसीकरण मोहीम राबवावी, अशी विनंती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

डॉ. सावंत एका आरोग्यविषयक कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य या लसीकरण मोहिमेनंतरही आदिवासी आणि दुर्गम भागातील मुलांचे लसीकरण होत नाही. शरीरात पू होणे, कुपोषण, न्यूमोनिया यांसारख्या आजारांना ती बळी पडतात. हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मदत करावी, अशी विनंती डॉ. सावंत यांनी केली आहे. दुर्गम भागातील लसीकरणासाठी सॉफ्टवेअर किंवा ऍपची मदत घेता येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सुचवले आहे. "डब्ल्यूएचओ' सध्या 15 आदिवासी जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवत आहे. त्या जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठावे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या वेळी "डब्ल्यूएचओ'चे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बॅकडम उपस्थित होते. गोवर आणि रुबेला या आजारांसाठी महाराष्ट्रात पुढच्या वर्षापासून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.