इंद्राणी, पीटरसह चौघांवर खुनाचा आरोप निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्‍यामराय यांच्यावर हत्येचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या चौघांनी आरोप अमान्य केल्यामुळे न्या. एच. एस. महाजन यांनी एक फेब्रुवारीपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्‍यामराय यांच्यावर हत्येचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या चौघांनी आरोप अमान्य केल्यामुळे न्या. एच. एस. महाजन यांनी एक फेब्रुवारीपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

शीना हत्याकांड प्रकरणी आरोपनिश्‍चितीबाबत सीबीआय आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद 19 डिसेंबरपासून सुरू होता. शीना आणि पीटर यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल सावत्र भाऊ-बहीण असूनही त्यांच्यात अनैतिक संबंध होते. इंद्राणी आणि पीटरला ते मान्य नव्हते. शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते. यातूनच इंद्राणीने पहिला पती संजीव खन्नाच्या मदतीने 24 एप्रिल 2012ला शीनाची हत्या केली. रायगड येथे तिचा मृतदेह जाळण्यात आला. त्यासाठी त्यांचा चालक श्‍यामरायने इंद्राणीला मदत केली होती. या हत्याकांड प्रकरणी पीटरला सीबीआयने, तर इतर तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. सध्या चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

इंद्राणी, पीटर, संजीव यांच्यावर कटकारस्थान रचणे, अपहरण, हत्या, एकाच हेतूने कृत्य करणे, पुरावे नष्ट करणे असे आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय, इंद्राणी आणि संजीववर शीनाचा भाऊ मिखाईलच्या हत्येचा प्रयत्न व त्यासाठी कटकारस्थान रचल्याचेही आरोप निश्‍चित केले आहेत. शीनाची हत्या झाली त्याच दिवशी मिखाईललाही शीतपेयातून विष देण्याचा प्रयत्न इंद्राणीने केल्याचे मिखाईलचे म्हणणे आहे. शीना आणि राहुल यांच्यात संभाषण झाल्याचे भासवणाऱ्या ई-मेलमध्ये फेरफार केल्या प्रकरणी इंद्राणीवर आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील भरत बदामी आणि कविता पाटील यांचा आरोपनिश्‍चितीचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

इंद्राणीला हवा घटस्फोट
इंद्राणीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी विशेष सीबीआय न्यायालयाकडे मागितल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. तुरुंगात असताना भगवद्‌गीतेतील 700 श्‍लोकांचा इंग्रजीत केलेला अनुवाद प्रसिद्ध करण्याची परवानगीही तिने मागितली आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील निम्मी रक्कम "इस्कॉन'ला, तर निम्मी भायखळा तुरुंगातील महिला कैद्यांच्या सुविधेसाठी देण्याची तयारी तिने दर्शवली आहे.