वाहतूक कोंडीपर्यंत टोलबंदीचा आग्रह 

jitendra-awhad
jitendra-awhad

ठाणे - मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केले आहे. यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या इतर मार्गांवरील वाहनांची रहदारी वाढली आहे. टोल घेण्यासाठी वाहने थांबवून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत असल्याने मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि आनंदनगर (मुलुंड) टोल नाक्‍यावरील टोलवसुली थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. टोलबंदी न केल्यास सोमवारपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस कायदा हातात घेऊन आम्ही ती टोलवसुली बंद करू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला आहे. 

मुंब्रा बाह्यवळण मार्ग दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त सापडला असून, सोमवारी मध्यरात्रीपासून हा मार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक ऐरोली, शिळ फाटा मार्गे वळवण्यात आली आहे. 

मुंब्रा बायपास हा धोकादायक झाला होता. या बायपासवरील पूल तर जर्जर झाला होता. हा पूल कोसळला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळेच हा प्रश्‍न लावून धरला होता. अखेर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन या मार्गाची दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आपण त्यांचे आभारच मानतो; मात्र कोपरी पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षे करत असूनही या रुंदीकरणाला मुहूर्त मिळत नाही. खारीगाव ते शहर; साकेत ते रुस्तमजी असे सर्व्हिस ब्रिज उभारण्याचीही मागणी केली होती, असे आव्हाड यांनी सांगितले. विटावा ते कोपरी पुलाचाही आमचा प्रस्ताव आहे; मात्र ही मागणी पूर्ण न केल्यामुळेच आज या शहरावर वाहतूक कोंडीचा भार पडत आहे. आज निर्माण झालेली ही वाहतूक कोंडी सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच होत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. 

पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच 
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कालावधीत वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरू होण्यापूर्वी केली होती. त्यामुळे वाहनचालकांना ऐरोली अथवा मुलुंडचा असा एकच टोल भरावा लागणार होता; मात्र पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com