"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ 

"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ 

मुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल टाकत सायबर चोरांनी जोगेश्‍वरीतील महिलेला फसवल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी चक्क इंटरॅक्‍टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस) क्रेडिट कार्डची माहिती विचारून 26 हजारांचा व्यवहार करण्यात आला आहे. 

जोगेश्‍वरीत राहणाऱ्या सीमा दुबे या अंधेरीत एका कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही क्रेडिट कार्डची मुदत संपत आली होती. त्यांना संबंधित बॅंकेतील अधिकाऱ्याच्या नावाने फोन आला. समोरच्या व्यक्तीने क्रेडिट कार्डची मुदत संपत असल्याची माहिती दुबे यांना दिली. कार्डची मुदत वाढवण्यासाठी त्याने दुबे यांच्याकडे विविध माहिती विचारण्यास सुरवात केली. दुबे यांनी त्याला अशी माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आयव्हीआरएस यंत्रणेद्वारे तुम्ही स्वत-च क्रेडिट कार्डची मुदत वाढवू शकता, असे सांगितले. त्याने दूरध्वनी सुरू असतानाच कॉन्फरन्स कॉल लावला. त्याद्वारे दुबे यांना आयव्हीआर यंत्रणेतून सूचना मिळू लागल्या. त्यावर विश्‍वास ठेवून दुबे यांनी सूचनांप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होताच दुबे यांच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक आला. दोन दिवसांनंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून 26 हजारांचा व्यवहार करण्यात आला. दरम्यान, हा ओटीपी समोरच्या व्यक्तीला दिला नसल्याचे दुबे यांचे म्हणणे आहे. अंधेरी पोलिस ठाण्यात याबाबत दुबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. 

यापासून राहा सावध! 
- एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, मुदत संपली आहे; ते पुन्हा सुरू करण्यासाठी ओटीपी सांगा. 
- बॅंक खाते आधार कार्डाशी जोडण्यासाठी ओटीपी मागणी. 
- क्रेडिट कार्डावर बोनस पॉइंट मिळवण्यासाठी ओटीपीची मागणी. 
- केवायसी प्रक्रिया करण्यासाठी ओटीपीची मागणी. 
- विम्याची ठेव मिळवण्यासाठी बॅंक खात्याची माहिती द्या. 

बांगलादेश सीमेवर अड्डा 
बॅंक अधिकारी बोलत असल्याचे सांगून क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती घेणाऱ्यांचा झारखंडमधील जामतारा हा अड्डा बनला होता. कारवाईची कुणकुण लागताच हे चोरटे जंगलात पळ काढत असत. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांमार्फत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. आरोपींबाबतची माहिती या पोर्टलमार्फत झारखंड पोलिसांना मिळू लागल्यानंतर आरोपींची धरपकड होऊ लागली. त्यामुळे आता या चोरट्यांच्या टोळ्यांनी बांगलादेश सीमेवर तळ ठोकला आहे. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण होत आहे. 

राज्यातील क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डांचे गुन्हे 
वर्ष नोंद उकल अटक सोडवलेल्या गुन्ह्यांची टक्केवारी 
2015 610 58 67 9.5% 
2016 686 51 43 7.4% 
2017 1522 134 195 8.8% 
2018 529 66 76 12.4% 
(मे 2018 पर्यंत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com