टेकफेस्टमध्ये तरुणांची उसळली गर्दी!

टेकफेस्टमध्ये तरुणांची उसळली गर्दी!

विजेवर धावणारी स्कूटर; 9 डी व्हर्च्युअल रिऍलिटी आणि गोल्फ सिम्युलेटर
मुंबई - 'आयआयटी टेकफेस्ट'मध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मोबाइल गेमिंग, व्हर्च्युअल रिऍलिटी आणि सिम्युलेटर तंत्रज्ञान पाहण्यासाठी तरुणांनी शनिवारी मोठी गर्दी केली होती. रशियातील स्पर्धकांची मोबाइल कॅमेऱ्याला चिकटणारी स्टिकी लेन्स, बॅटरीवर चालणारी स्कूटर, 9 डी व्हर्च्युअल रिऍलिटी, गोल्फ सिम्युलेटर आदींकडे तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले होते.

आपल्या स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्याला छोट्या लेन्स चिकटवून मोबाइल स्क्रीनवर मोठ्या प्रतिकृती पाहणे स्टिकी लेन्समुळे शक्‍य झाले आहे. अगदी केसापासून टेलिव्हिजन स्क्रीनमधील पिक्‍सेलही या लेन्समुळे पाहता येतात. रशियातील सेंट पीटर्सबर्गच्या इवान कोनोनोव्ह या तरुणाने हे स्टिकी लेन्सचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शालेय शिक्षण, जैवशास्त्रीय वापर आणि भूविज्ञानासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्‍य असल्याचे इवान याने सांगितले. एखाद्या मायक्रोस्कोपला पर्यायी म्हणून ही लेन्स उपयुक्त ठरते, असे तो म्हणाला.

इलेक्‍ट्रिक स्कूटर
अवघ्या चार किलो वजनाची आणि एकदा चार्ज केल्यावर बॅटरीवर 30 किलोमीटरचा पल्ला गाठणारी इलेक्‍ट्रिक स्कूटर रशियातील एका तरुणाने तयार केली आहे. शंभर किलो वजनाच्या व्यक्तीलाही ताशी 25 किलोमीटर या वेगाने या स्कूटरवरून जाता येते. या इलेक्‍ट्रिक स्कूटरबाबत आणखी बरेच संशोधन आणि विकास अपेक्षित आहे, असे त्याने सांगितले. याची बॅटरी चार्ज होण्यास दोन तास लागतात.

9 डी व्हर्च्युअल रिऍलिटी
चित्रपटाच्या स्क्रीनवर घडणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात बसलेल्या खुर्चीवर अनुभवायला मिळण्याचा चमत्कार 9 डी व्हर्च्युअल रिऍलिटी घडवते. 360 डिग्री व्ह्यू प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी टेकफेस्टमधील उपस्थितांना मिळाली. चित्रपटात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्‍ट,चित्रीकरणादरम्यानचे व्हायब्रेशन्स, तसेच साउंड इफेक्‍टही या व्हर्च्युअल रिऍलिटीतून अनुभवता येतात. व्हर्च्युअल रिऍलिटीवर आधारित स्क्रीन पाहताना डोळ्यांना "व्हीआर गिअर' हे उपकरण लावून हॅंड्‌स फ्री वापरणे शक्‍य होते.

गोल्फ सिम्युलेटर
एखाद्या मैदानात उतरून प्रत्यक्ष खेळावे असे खरेखुरे गोल्फ खेळण्याचा अनुभव गोल्फ सिम्युलेटरद्वारे तरुणाईने अनुभवला. समोरच्या डिजिटल स्क्रीनवर खेळतानाच प्रत्यक्षात हातात गोल्फ स्टिक घेऊन खेळण्याचा आनंद सिम्युलेटरवरून टेकफेस्टप्रेमींनी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com