β मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी

प्रकाश पाटील
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

मुंबई शहराचा आज विचार केला तर येथे दोन पक्षाची ताकद दिसून येते ती म्हणजे भाजप आणि शिवसेना. त्या खालोखाल कॉंग्रेस असली तरी ती गटातटात ती विखुरली आहे. जर युती झाली तर विजय कोणाचा याविषयी भविष्य वर्तविण्याचे कारण नाही. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत त्या युतीमध्येच. भ्रष्टाचाराविषयी तरुणांमध्ये प्रचंड चीड आहे. बलाढ्य शिवसेनेला सत्तेवरून खाली कोण खेचणार? कोण ‘जायंट किलर‘ होणार? याचीच सध्या चर्चा आहे. जर युती झाली नाही तर खरा सामना रंगणार आहे तो भाजप विरुद्ध शिवसेनेत हे नक्की ! 

महाराष्ट्रच काय तर देशातील प्रत्येक नागरिकाला जिवाची मुंबई करायला आवडतं. "एक बार तो मुंबई जाना हेै! यह शहर क्‍या है! इसमे क्‍या क्‍या भरा है!" ही सहज प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात असते. आज एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 30 लाखाच्या घरात गेली आहे. तसेच मुंबई महापालिकेचे बजेट 37 हजार कोटीच्या घरात आहे. एकटी मुंबई देशाचीही आर्थिक राजधानी आहे. हे शहर जसे गर्भश्रीमंतांचे, श्रीमंतांचे, मध्यमवर्गीयांचे आहे तसेच कष्टकऱ्यांचे आणि झोपडपट्टी धारकांचे आहे. देशाच्या प्रवेशद्वारापासून पंचतारिक हॉटेल्स, बॉलिवूड ते जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टीचा उल्लेख या ना त्या कारणाने होतोच. मुंबईच्या झगमगाटाचा भल्या भल्यांना मोह पडतो. ही मायानगरी महाराष्ट्राची राजधानी. एकेकाळी कम्युनिस्टांनी, समाजवाद्यांनी आणि त्यानंतर शिवसेनेने या शहरावर वर्चस्व गाजविले. 

बंद सम्राटही याच नगरीत होऊन गेले. त्यापैकी जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तसे पाहिले जाते. मुंबईने "चले जाव चळवळ‘ जशी पाहिली, अनुभवली तशी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची झालेली "न भूतो न भविष्यती सभा‘ही तिने पाहिली. शिवसेनेला तर तिने भरभरून दिले. महाराष्ट्राची लाइफलाइन असलेल्या या शहरामुळेच शिवसेनेचा राज्यभर विस्तार झाला. हे ही तितकेच खरे. तिने तसे सर्वांच्या पदरात काही ना काही दान टाकले. याच मुंबईसाठी 105 जण हुतात्मा गेले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच झालाच पाहिजेची चळवळही तिने अनुभवली. 

वसंतदादा पाटील एकदा म्हणाले, "महाराष्ट्रात मुंबई आहे. पण मुंबईत महाराष्ट्र आहे का?‘‘ पुढे मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेने राजकारण केले. "बजाव पुंगी, हटाव लुंगी‘ ही दाक्षिणात्याविरोधातील घोषणा असेल किंवा उत्तर भारतीय असतील. मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेने सत्ता मिळविली. गेल्या पंचवीसहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचेच वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने अनेक वेळा केला. मात्र यश आले नाही. मध्यंतरी एकदा कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सत्ता मिळविली पण त्यानंतर पुन्हा शिवसेनाच सत्तेवर राहिली. 

लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे पण यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यामुळे सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे. यापूर्वी भाजप-शिवसेना युती एकत्र लढली होती. यावेळी युती होईल की नाही हे आताच सांगता येत नसले तरी शहरात भाजपची ताकदही पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढली आहे. त्यामुळे विजयी होण्याचा आत्मविश्‍वास या पक्षाच्या नेत्यांमध्ये बळावला आहे. हे दोन पक्ष सोडून इतर सर्व पक्ष युती तुटावी म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मुंबई शहराचा आज विचार केला तर येथे दोन पक्षाची ताकद दिसून येते ती म्हणजे भाजप आणि शिवसेना. त्या खालोखाल कॉंग्रेस असली तरी ती गटातटात ती विखुरली आहे. जर युती झाली तर विजय कोणाचा याविषयी भविष्य वर्तविण्याचे कारण नाही. 

मुंबई शहर हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सोन्याचे अंड प्रत्येकाला हवे आहे. त्यामुळे या शहराची सत्ता स्वत:कडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार यात शंका घेण्याचे कारणही नाही. त्यामुळे मुंबईवरून युतीत कलगीतुरा सुरू आहे. तो आणखी सुरू राहणार की सर्वच पक्ष स्वबळावर लढणार याकडेही महाराष्ट्राचे लक्ष आहे. विधानसभेसारखी पुर्नरावृत्ती झाल्यास प्रत्येकाची कसोटी लागणार हे उघड आहे. निवडणुकीच्या रणांगणात रथीमहारथी योद्धे उतरणार हे नक्की. आज भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत त्या युतीमध्येच आणि भ्रष्टाचाराविषयी तरुणांमध्ये प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे. बलाढ्य शिवसेनेला सत्तेवरून खाली कोण खेचणार ? कोण जायंट किलर होणार ? याचीच सध्या चर्चा आहे. जर युती झाली नाही तर खरा सामना रंगणार आहे तो भाजप विरुद्ध शिवसेनेत !