नाट्य संमेलनाध्यक्षपदी जयंत सावरकर

janat-savarkar
janat-savarkar

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेल्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. एकमताने निवड झाल्याने इच्छापूर्तीचे समाधान लाभले, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्‍यातून मोठ्या भावासोबत जयंत सावरकर मुंबईत आले. रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलन अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सासरे मामा पेंडसे यांनी नोकरी सोडून अभिनय करण्यास विरोध केल्यामुळे नोकरी सांभाळून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द अथक मेहनतीने घडवली. ‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा, ‘तुझ आहे तुझपाशी’मधील शाम, ‘सौजन्याची ऐशीतैशी’मधील मंडलेकर, ‘सम्राट सिंह’मधील विदूषक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. इना मिना डिका, कुरुक्षेत्र, जावई माझा भला, गुलाम ए मुस्तफा अशा १०० हून अधिक चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. मा. गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची सकाळी बैठक झाली. यंदा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अशोक समेळ, बापू लिमये, प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास भणगे, विनायक केळकर आदींची नावेही सुचवण्यात आली होती. मात्र, जयंत सावरकर यांची एकूणच ज्येष्ठता, त्यांचे रंगभूमीवरील योगदान पाहता त्यांच्या नावाला कुणीही विरोध केला नाही, एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. ९७ व्या नाट्यसंमेलनासाठी उस्मानाबाद आणि नागपूर येथून निमंत्रणे आली असून, त्यावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांतच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती  नाट्यपरिषदेने दिली. 

बिनविरोध निवड झाली तरच मी अध्यक्ष होईन, अशी मी व्यक्त केलेली इच्छाही पूर्ण झाल्याचा आनंद अधिक आहे. अध्यक्षपदाचा काळ लहान असला तरी योग्य ‘व्हिजन’ असेल तर कामे नक्कीच पूर्ण करता येतात. येत्या काळात त्याबद्दलचे विचार नक्कीच मांडेन. 

- जयंत सावरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com