स्वच्छ भारत योजनेचे तीनतेरा

स्वच्छ भारत योजनेचे तीनतेरा

जोगेश्वरी/कांदिवली - स्वच्छ भारत योजनेंतर्गत महापालिकेने शहरात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्‍यक तेथे शौचालये उभारण्याबरोबरच कचराकुंड्याही ठेवल्या; मात्र अवघ्या काही महिन्यातच शौचालय व कचराकुंड्यांची दुरवस्था झाल्याचे पश्‍चिम उपनगरातील जोगेश्‍वरी व कांदिवली या परिसरात पाहायला मिळते. याबाबत पालिका व लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 

जोगेश्वरी पूर्वेकडील अंबिका नगरमधील जय संतोषी माता मित्रमंडळाजवळ पालिकेने म्हाडा योजनेंतर्गत आमदार निधीतून १४ शौचालये बांधली. या शौचालयांच्या सफाईसाठी अनेक महिन्यांपासून सफाई कामगार येत नसल्याने शौचालयामध्ये सर्वत्र घाण पसरली आहे. रात्रीच्या वेळी शौचालयात उंदीर, घुशी थैमान घालतात. अनेकदा कुत्रे झोपलेले असतात. त्यामुळे त्यांचा वापर कसा करावा, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. १४ शौचालयांपैकी १० शौचालये तुडुंब भरलेली आहेत. शौचालय साफ करण्यासाठी पालिकेने नळ आणि टाकी बांधली होती; पण वर्षभरातच नळ आणि टाकी काही समाजकंटकांनी तोडल्याने पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे शौचालयात घाण व दुर्गंधी पसरली आहे. तसेच शौचालयापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. शौचालयाच्या या दुरवस्थेबाबत नगरसेवक प्रवीण शिंदे, आमदार रवींद्र वायकर यांना लेखी निवेदन देऊनही कारवाई झाली नसल्याचे येथील रहिवासी किशोर गायकवाड यांनी सांगितले. 

कांदिवली पश्‍चिमेकडील चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट येथील शीतल ट्रेडिंग बी-११८ परिसरातील पदपाथवरील गटारांच्या झाकणांची दुरवस्था झाली असून काही झाकणे गायब झाल्याने अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. याच पदपथावर कचरा जमा करण्यासाठी लावलेल्या स्टीलच्या कचराकुंडीचीही दुरवस्था झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि देखभाल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, स्वच्छता अभियान फक्त कागदावर आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट येथील दुरवस्था झालेल्या मार्गाचे व पदपथाच्या कामाचे टेंडरचे काम झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामे सुरू करण्यात येतील. 
- विशाल पाटील, कनिष्ठ अभियंता, मुंबई महापालिका  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com