आमदार पाटील यांना पोलिसांनी फरफटत नेले

आमदार पाटील यांना पोलिसांनी फरफटत नेले

कळंबोली - सिडकोच्या कळंबोली गावातील भूखंडावर बेकायदा उभारलेल्या इमारतीवर कारवाई थांबविण्यासाठी गेलेल्या शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांना पोलिसांनी फरफटत नेत अटक केली. आमदार पाटील यांच्याबरोबरच तीन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या कारवाईने कळंबोली परिसरात तणाव निर्माण होऊन शेकापच्या आवाहनानंतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

कळंबोली प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी निवारा म्हणून बांधकामे केली असल्याचे आमदार पाटील यांचे म्हणणे होते. सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर अगोदर "माझ्यावर बुलडोझर चालवा; त्यानंतरच अतिक्रमणे पाडा,' अशी आक्रमक भूमिका आमदार पाटील यांनी घेतली. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले. आमदार पाटील यांच्यासह नगरसेवक रवींद्र पाटील, बबन मुकादम, गोपाल भगत, रवी भोईर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पाटील यांच्यापर्यंत पोलिस पोचू नयेत, यासाठी कार्यकर्त्यांनी साखळी तयार केली. मात्र, पाटील यांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये नेले. त्यानंतर त्यांना कळंबोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या जबरदस्तीमध्ये बाळाराम पाटील यांना मार लागला असल्याचे सांगण्यात आले.

पाटील यांना सोडण्याच्या मागणीसाठी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कळंबोली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला; मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई पूर्ण झाल्यानंतर आमदार पाटील यांना सोडण्यात आले. या कारवाईमुळे कळंबोली परिसरात बंद पाळण्यात आला.

संसार उघड्यावर
कळंबोली परिसरात सिडकोने केलेल्या कारवाईचा सुमारे 70 ते 80 कुटुंबांना फटका बसला. या कारवाईनंतर अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. या वेळी काही वृद्ध नागरिकांनाही जबरदस्तीने बाहेर काढण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com