'ई सकाळ'च्या बातमीमुळे त्यांचा पगार झाला!

रविंद्र खरात
शनिवार, 17 जून 2017

कल्याण - जून महिन्याची 17 तारीख उजाडूनही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचारी वर्गाचा पगार जमा झाला नसल्याबाबत "ई सकाळ'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन जमा करण्यात आले आहे.

कल्याण - जून महिन्याची 17 तारीख उजाडूनही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचारी वर्गाचा पगार जमा झाला नसल्याबाबत "ई सकाळ'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन जमा करण्यात आले आहे.

"पावसाळा सुरू झाला, मुलांची शाळाही सुरु झाली. मुलांची फि भरायला, साहित्य खरेदी करायला खिशात पैसा नाही' अशी व्यथा मांडत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी "आत्महत्या केल्यावर प्रशासनाला जाग येईल का?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. याबाबत "ई सकाळ'वर आज (शनिवार) सकाळी बातमी प्रसिद्ध झाली होती. ही बातमी सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली. या पार्श्‍वभूमीवर "ई सकाळ'वरील बातमीची दखल घेत परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि परिवहन कर्मचारी संघटना नेते आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी प्रशासन अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे दोन दिवसांनी होणारा पगार आजच करण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास पालिकेकडून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ती रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली. सायंकाळपर्यंत सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या खात्यात पगार जमा होईल, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली .

■ कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम बिकट अवस्थेत!
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमामध्ये 538 हुन अधिक अधिकारी-कर्मचारी काम करतात. दिवसेंदिवस केडीएमटीच्या बसेसचे रस्त्यावर धावण्याचे प्रमाण कमी झाल्याने उपन्न घटले असून दुसरीकडे पालिकेकडून प्रति महिना दीड कोटी रुपये अनुदान वेळेवर येत नसल्याने परिवहन उपक्रमामधील अधिकारी-कर्मचारी वर्गाचा मागील अनेक महिन्यात लाखो रूपयांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भरला गेलेला नाही. अशा परिस्थितीत जून महिन्याची 17 तारीख आली तरी पगार न झाल्याने कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ येते का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय मुलांची शाळा सुरु झाली. साहित्य खरेदी, बसची फी, ट्यूशन फी, शाळेची फी, घरातील किरकोळ खर्च, औषध उपचार, सणासुदीची खरेदी आदी खर्च सांभाळता सांभाळता तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक कर्मचारी अधिकारी वर्गावर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत.

■ अनेकांनी स्वीकारली नवी मुंबई, ठाणे मनपा परिवहन उपक्रमामध्ये नोकरी
अनेकांनी येथील नोकरी सोडून नवी मुंबई, ठाणे मनपा परिवहन उपक्रमामध्ये नोकरी स्वीकारली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी परिस्थिती सुधारेल या आशेवर काम करणे सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची थकबाकी न दिल्याने बसेस दुरुस्तीकडे ठेकेदार कानाडोळा करत असल्याने रस्त्यावर येणारी बसेस संख्याही घटत आहे. उपन्न कमी होऊ लागल्याने परिवहन उपक्रम डबघाईला आला आहे. यामुळे पालिकेच्या अनुदानाचा टेकू घेऊन हा उपक्रम सुरु आहे.