कल्याण वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱयाचा असा ही प्रामाणिकपणा

रविंद्र खरात
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

संबधित महिला कर्मचारीने प्रामाणिक पणा दाखविल्याने तिचे कौतुक केले असून, तिने जमा केलेले 47 हजार रुपये महात्मा फुले पोलिस ठाण्यात जमा केले आहेत. ज्या मोटार सायकल स्वराचे पैसे पडले आहेत त्याने संबधित पोलिस ठाण्यात जाऊन घेण्याचे आवाहन कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी केले आहे.

कल्याणः एका मोटार सायकलस्वाराचे पडलेले सुमारे 47 हजार रुपये एका वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱयाने वाहतूक शाखेत जमा करून एक आगळा वेगळा प्रामाणिकपणा दाखविला आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्या महिला कर्मचाऱयाचे कौतुक केले आहे.

वाहतूक पोलिस चिरीमिरी घेतो, उद्धट बोलतो, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते अशी वाहतूक पोलिसाबाबत समाजात नेहमीच टिका होते. त्याच्यांत ही माणूसकी असून, तो भर पावसात वाहतूक कोंडी दूर करतो. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः रस्ते मधील खड्डे बुजवितो असे प्रकार समोर आले आहेत. एका वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीने वाहतूक शाखेत जमा करून एक आगळा वेगळा प्रामाणिकपणा दाखविला आहे.

कल्याण शहर म्हणजे जणू काही कोंडीचे शहर झाले असून, ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेच्या ऐवजी वाहतूक पोलिसांवर टिका होत आहे. मात्र, वाहतूक पोलिसात माणूस असून तो जनतेसाठी धावत असल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आज ही तशीच घटना घडली. कल्याण पश्चिम गुरुदेव हॉटेल परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. आज (शनिवार) सकाळी 10 च्या सुमारास वाहतूक शाखेच्या महिला पोलिस शिपाई वंदना कावळे या आपल्या कर्तव्य बजावत होत्या. वाहतूक कोंडी दूर करत असताना एक मोटार साइकलस्वार भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याच्या खिशातील 47 हजार रुपये पडले. नागरीकांच्या मदतीने ते जमा करून कल्याण वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात आणून जमा केले. कावळे यांनी प्रामाणिकपणाचा दाखला दिल्याने कल्याण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव आणि अन्य अधिकारी कर्मचारी वर्गाने त्या महिला कर्मचाऱयाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.