स्वाईन फ्लूला घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावीः महापौर देवळेकर

सुचिता करमरकर
शुक्रवार, 7 जुलै 2017

कल्याण : स्वाईन फ्लू हा संसर्ग जन्य आजार असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेत औषधोपचार करावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले आहे. पालिकेने या आजाराबाबत केलेल्या उपाययोजनांचा आज (शुक्रवार) त्यांनी आढावा घेतला.

राज्यात तसेच जिल्ह्यात वेगाने फैलावणाऱ्या या आजारामुळे नागरिक घाबरले आहेत. मात्र, तसे न करता नागरिकांनी तत्काळ औषधोपचार सुरु करावेत असे आवाहन महापौरांनी केले. स्वाईन फ्ल्यू तसेच इतर साथ रोगांसंदर्भात महापौर देवळेकर आणि सेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पालिका क्षेत्रातील स्वाईनच्या रुग्ण परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. खबरदारीचे उपाय म्हणून रुख्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष साथरोग कक्ष तयार करण्यात आले असून, महापौरांनी त्याची पाहणी केली. महापालिका साथ रोगांविरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात महापौरांनी स्वाईन फ्ल्यू रुग्णांची सध्याची स्थिती, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेची तयारी, औषधांचा साठा, आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येणाऱ्या उपाय योजना, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची माहिती, रुख्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर स्टाफची उपस्थिती, रिक्त असणारी महत्वाची डॉक्टरांची पदे यांच्याबरोबरच अनेक गोष्टींचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापौरांसह शिवसेना गटनेते रमेश जाधव, स्थायी समिती सदस्य दशरथ घाडीगांवकर, माजी नगरसेवक गणेश जाधव उपस्थित होते.