फेरीवाल्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आक्रमक

रविंद्र खरात
गुरुवार, 22 जून 2017

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉकवरील फेरीवाल्याविरोधात महापालिकेच्या विशेष पथकाने पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई सुरु केली आहे. आज (गुरुवार) दुपारी कल्याण पश्‍चिममधील साधना हॉटेलच्या बाजूला रस्त्यात उभे असलेल्या फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉकवरील फेरीवाल्याविरोधात महापालिकेच्या विशेष पथकाने पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई सुरु केली आहे. आज (गुरुवार) दुपारी कल्याण पश्‍चिममधील साधना हॉटेलच्या बाजूला रस्त्यात उभे असलेल्या फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच फेरीवाल्यांनी कायदा हातात घेवू नये, जशास जसे उत्तर देवू, असा इशाराही दिला आहे. कल्याण पश्‍चिममधील रेल्वे स्थानक स्कायवॉक आणि परिसरामध्ये फेरीवाले बेकायदेशीरपणे बसत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तो दूर करावा अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती. पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास हक्कभंग आणू असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेच्या महासभेतही हा विषय गाजला होता , दरम्यान बुधवारी घरत यांनी पालिका अधिकारी, पोलिस, वाहतूक पोलिस यांची संयुक्त बैठक घेवून फेरीवाल्यींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या विशेष पथकामार्फत आज सकाळपासूनच कल्याण रेल्वेस्थानक परिसरामध्ये स्कायवॉकवर दामोदर साळवी यांच्या नेतृत्त्वाखालील फेरीवालेविरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई केली. दुपारी पावणे एकच्या सुमारास साधना हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यात एक फेरीवाला हातगाडीवर आंबे विक्री करत होता. त्या गाडीवर कारवाई सुरु असताना त्या फेरीवाल्याने विरोध करत काही लोकांना आवाज दिला. त्यानंतर काही फेरीवाले एकत्र आले. त्यांनी साळवी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.

पालिकेचे विशेष पथक
कल्याण रेल्वेस्थानक परिसरामधील काही प्रमुख रस्ते आणि स्कायवॉकवर बसणाऱ्या फेरीवाल्यींविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यात पोलिस बंदोबस्त असून एका गटात दहा कर्मचारी आहेत. माल जप्त करण्यापेक्षा फेरीवाला बसणार नाही ही जबाबदारी त्या विशेष पथकावर असून कामचुकार कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर त्वरित कारवाईचे संकेत पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिले आहे. जेथे पालिका कर्मचारी आणि पोलिस कमी पडतील तेथे खासगी सुरक्षा रक्षकांचे पथक काम करेल, याबाबत स्थायी समिती आणि महासभेसमोर प्रस्ताव पाठवले जातील अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

विशेष पथकामार्फत फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई सुरु झाली आहे. फेरीवाल्यांनी कायदा हातात घेवू नये. आगामी काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येवून पोलिसांच्या मदतीने फेरीवाल्यींविरोधात कारवाई सुरु ठेवणार असून आगामी काळात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
- अतिरिक्त आयुक्त संजय घरत