कल्याण: सामाजिक कार्यकर्ता घाणेकरांनी मांडला पालिकेच्या कारभाराचा लेखाजोखा

Kalyan Dombivali Municipal Corporation
Kalyan Dombivali Municipal Corporation

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात मागील वीस वर्षांत पालिकेने कोट्यावधी रुपये खर्चुन रस्ते, पाणी पुरवठा योजना, गटारे आणि शौचालय दुरुस्ती उद्याने, नालेसफाई अशी अनेक कामे केली. मात्र यानंतरही पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या गैरसोई संपलेल्या नाहीत. हे नेमकं का झालं? यात कुठे पाणी मुरतयं? याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पालिकेच्या या अशाच कारभाराचा निषेध करण्यासाठी आता नागरिक तयारी करत आहेत. सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास घाणेकर यांनी हे आवाहन करत पालिकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

1996 ते 2016 या कालावधीत पालिकेने नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी केलेला खर्च पाहिला तर सर्व सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी आकडेवारी हाती येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 1996 ते 2016 च्या अर्थसंकल्पांमध्ये विविध विभागांवर झालेला खर्च: बांधकाम विभाग : 383.5 कोटी, रस्ते दुरुस्ती : 234.5 कोटी, गटारे आणि शौचालये दुरुस्ती : 40.1 कोटी, नवीन रस्ते बनवणे : 223.35 कोटी, नवीन उद्याने बनवणे : 12.63 कोटी (यात खाजगी सहभागातून बनवलेली उद्याने समाविष्ट नाहीत.)

पाणीपुरवठा विभागावरील एकूण खर्च : 910.76 कोटी, एमआयडीसी आणि एमडब्ल्यूएसएसबी यांना पाणीपुरवठ्यासाठी दिलेली रक्कम : 459.89 कोटी

टँकर भाडे : 17.01 कोटी, पाणी पुरवठा व्यवस्थेचा देखभाल दुरुस्ती खर्च : 90.97 कोटी

नालेसफाई : 33.37 कोटी. याव्यतिरिक्त काही कोटी रुपये अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या दालन दुरुस्ती आणि नुतनीकरणावर, तसेच कित्येक हजार कोटी महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन तसेच वाहन भत्त्यांवर खर्च झालेले आहेत. महानगरपालिकेच्या एकूण अर्थसंकल्पीय खर्चापैकी सुमारे 45% एवढी रक्कम अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन, वाहनभत्ता, मोबाईल बिल इत्यादींवर गोष्टींवर खर्च केले जातात. सन 2016-17 चा अर्थसंकल्प सुमारे 1500 कोटी रुपयांचा आहे. यावरून झालेल्या खर्चाचा अंदाज सहज येऊ शकतो.

एवढ्या प्रचंड रकमा करदात्या नागरिकांच्या पैशातून खर्च होऊनही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अवस्था अत्यंत गलिच्छ महानगरपालिका अशी झाली आहे. यापुढे तरी नागरिकांनी आपल्या कररुपी पैशाचा योग्य विनियोग होतो कि नाही याची खातरजमा करावी आणि कोणत्याही सुविधा न मिळता असाच कर भरत राहायचा का याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन घाणेकर यांनी केले आहे. 

ही सर्व आकडेवारी पालिकेच्या अंदाजपत्रकातील आहे. यानुसार प्रत्यक्षात कामे झाली का? असा सवाल त्यांनी या निमित्ताने विचारला आहे. हा झालेला खर्च करदात्या नागरिकांच्या पैशातुन झाला आहे, मात्र त्या तुलनेत नागरिकांना सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत हे आज शहरातील समस्या पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. यासर्वाविरोधात नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन घाणेकर करत आहेत. हा कोणताही राजकिय विषय नाही यात नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत हाच प्रमुख हेतू असल्याचेही घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com