तुम्हाला निवडून देऊन चूक केली का? नागरिकांचा सवाल

रविंद्र खरात
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून जागरूक नागरिकांनी सोशल मिडियावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सल्ला आणि सवाल केला आहे. सोशल मिडियावरील पोस्ट सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

कल्याण : सोशल मीडिया एक मोठे माध्यम आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. असेच एक सुविधा नाही तर कर नाही एक आंदोलन उभे असून नागरिक कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या विरोधात उभे ठाकले असताना शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असून त्यावर सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष्य वेधत आहे. ते म्हणजे आम्ही आपल्याला निवडून दिले ही आमची मोठी चूक आहे का? असा सवाल नगरसेवकांना केला आहे.

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यातील खड्डयांमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त असून शहरातील जागरूक नागरिकांनी सोशल मिडियावर सर्व पक्षीय नगरसेवकांना सल्ला आणि सवाल केला आहे. सोशल मिडियावरील पोस्ट सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नगरसेवकांना आवाहन स्वताच्या वॉर्डात पायी फिरा, मुख्य रस्त्यावरून रिक्तषा बसून फिरा, आपले वाहन बाहेर काढू नका, अगदी पालिकेच्या महासभेला सुद्धा रिक्षाने किंवा पायी सर्वसामान्य नागरिकांसारखे जाऊन अनुभव घ्या.
नागरिकांचे होणारे हाल समजून घ्या, केवळ आयुक्त किवा अधिकारी याला जबाबदार आहेत असे समजु नका. आपणही या महानगरपालिकेचे ट्रस्टी आहात, चौकशी ही आपल्याकडे वाटचाल करणार आहे.

वेळीच नागरिकांना साथ द्या. आपल्या शहराची दुर्दशा करण्यात आपले पालकत्व जबाबदार आहे हे विसरुन चालणार नाही. आपण नागरिकांना अद्याप साथ का देत नाही याचे कारण काय? आपण कोणीही या परिस्थितीवर जाहिर आवाज का उठवला नाही. आम्ही आपल्याला निवडून दिले ही आमची मोठी चूक झाली का? असा संतापजनक सवाल केला आहे.

प्रत्येक नगरसेवक हा पालिकेचा ट्रस्टी आहे, कुठल्या कामाला महत्व दिले पाहिजे हे त्यांचा हातात आहे. प्रत्येक वार्डात किती रस्ते आहेत, किती खर्च केला, कधी केले, खराब का झाले, त्याचे ऑडिट झाले का? संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले का? हे सर्व करणे अपेक्षित होते मात्र सर्वच नगरसेवकांनी नागरिकांची निराशा केली आहे. म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमामधून मत व्यक्त केले आणि आमचा अधिकार आहे असे मत प्रसिद्ध आर्किटेक राजीव तायशेट्ये यांनी व्यक्त केले.