कल्याणमध्ये रेल्वे इंजिन घसरल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु; दोषींवर होणार कारवाई

रविंद्र खरात
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबईच्या दिशेने जाणारी हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्‍प्रेसचे इंजिन शुक्रवारी दुपारी रुळावरून घसरले होते. या प्रकरणाची रेल्वे प्रशासाने गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे.

कल्याण - मुंबईच्या दिशेने जाणारी हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्‍प्रेसचे इंजिन शुक्रवारी दुपारी रुळावरून घसरले होते. या प्रकरणाची रेल्वे प्रशासाने गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजुन वीस मिनिटांच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनच्या दिशेने येताना अवघ्या 500 मीटर अंतरावर क्रॉंसिंगला रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले होते. त्यामुळे कल्याण-कसारादरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तब्बल इंजिन रुळावर आणण्यास तब्बल दोन तास लागले. अखेर दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी मेल गाडी कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. या प्रकरणाची आजपासून उच्चस्तरीय चौकशी सुरु झाली आहे. चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर होण्याची शक्‍यता आहे. अहवालानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान चौकशी सुरू असताना तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांमधील मतभेद समोर आले. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात स्थानिक अधिकाऱ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्याची गय केली जाणार नाही. कल्याण रेल्वे स्थानकाकडे येताना मेल गाडीचा वेग कमी होता. रूळ बदलत असताना इंजिन का घसरले याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी सुरु असून 15 दिवसात हा अहवाल अपेक्षित आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. त्यासोबतच उपाय योजनांसाठी जे सल्ले देण्यात येतील त्यावरही विचार केला जाईल.
- रविंद्र गोयल, मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक