मुंबादेवीत फुलले कमळ!

- मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

शिवसेना करणार निकालाचा अभ्यास
मुंबई - मुंबादेवी व मलबार हिलचा गड राखण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. दोन्ही मतदारसंघांत "कमळ' फुलल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. या निकालाचा अभ्यास करून जनतेचा कौल स्वीकारणार असल्याचे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी सांगितले.

शिवसेना करणार निकालाचा अभ्यास
मुंबई - मुंबादेवी व मलबार हिलचा गड राखण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. दोन्ही मतदारसंघांत "कमळ' फुलल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. या निकालाचा अभ्यास करून जनतेचा कौल स्वीकारणार असल्याचे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी सांगितले.

गिरगाव, पेडर रोड, वाळकेश्‍वर, मुंबादेवीतील गुजराती मते निर्णायक ठरली आहेत. मराठी मतांचे विभाजन झाल्याने त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. विशेष म्हणजे मलबार हिलमधील लढाई ही भाजपकरता अस्तिवाची होती. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी प्रभाग क्र. 214, 215, 217, 218 व 219 मध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती; परंतु प्रभाग 215 मध्ये शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर यांचा विजय झाला. प्रभाग क्र.216 मधून कॉंग्रेसचे दत्ता नरवणकर विजयी झाल्याने दक्षिण मुंबईत कॉंग्रेसच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या गिरगावातच मीनल जुवाटकर यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. गिरगावात मराठी-गुजराती मते मिळावीत म्हणून भाजपने अनुराधा पोतदार-जव्हेरी यांना उमेदवारी दिली. त्याचा फायदा भाजपला झाला. उच्चभ्रू वस्तीचा विचार केला तर प्रभाग क्र. 219 मधून पुन्हा एकदा ज्योत्स्ना मेहता या विजयी झाल्या. मुंबादेवी मतदारसंघातील प्रभाग क्र. 221 मधून 16 उमेदवार रिंगणात होते. गुजराती, मराठी व मुस्लिम मतांचे विभाजन होऊन आकाश पुरोहित विजयी झाले.

दक्षिण मुंबईतही शिवसेनेला मराठी मते पडली आहेत. या निकालाचा अभ्यास करणार आहोत. काही जागांवर कमी मतांनी पराभव झाला. शेवटच्या 48 तासांत विरोधकांकडून सरकारी यंत्रणांचा वापर केला गेला. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे.
- खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव.

निवृत्त अधिकारी ते नगरसेवक
प्रभाग क्र. 216 मधून कॉंग्रेसचे दत्ता नरवणकर हे विजयी झाले. नरवणकर हे महापालिकेत अधिकारी म्हणून होते. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत ठेवलेला संपर्क व कॉंग्रेस नेते नौसिर मेहता यांच्या मेहनतीमुळे नरवणकरांची राजकीय इनिंग सुरू झाली.

'नोटा'ला पसंती
मलबार हिल व मुंबादेवी मतदारसंघात "नोटास्त्र' चांगलेच घातक ठरले आहे. सात प्रभागांत तीन हजार 685 "नोटा'ची नोंद आहे. प्रभाग क्र. 222 मध्ये 652, प्रभाग क्र. 217 मधून 655, प्रभाग क्र. 218 मधून 601 आणि प्रभाग क्र. 214 मध्ये 536, प्रभाग क्र. 215 मध्ये 423, प्रभाग क्र. 216 मध्ये 273 मतदारांनी "नोटा'चा वापर केला.

Web Title: kamal win in mumbadevi