कपिल शर्मावर फौजदारीची शक्‍यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

मुंबई - लाच प्रकरणाच्या ट्विटमुळे विनोदी कलाकार कपिल शर्माच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्याने बंगल्यामागील खारफुटीवर भराव टाकला असल्याचे सोमवारी मुंबई कांदळवन संधारण विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे फौजदारी कारवाई होऊन त्याला तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्‍यता आहे. त्याच्या शेजाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. 

मुंबई - लाच प्रकरणाच्या ट्विटमुळे विनोदी कलाकार कपिल शर्माच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्याने बंगल्यामागील खारफुटीवर भराव टाकला असल्याचे सोमवारी मुंबई कांदळवन संधारण विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे फौजदारी कारवाई होऊन त्याला तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्‍यता आहे. त्याच्या शेजाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. 

अंधेरी पश्‍चिमेकडील एसव्हीपी नगरात म्हाडाची रो हाउस आहेत. तिथे कपिल शर्मासह काही सेलिब्रेटींची घरे आहेत. रो हाउसच्या मागे खारफुटीवर भराव टाकण्यात आला असल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या "के‘ पश्‍चिम प्रभाग कार्यालयामार्फत वन विभागाकडे करण्यात आली होती. वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेनेही तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी या विभागाचे सहायक वन संरक्षक मकरंद बोडके यांनी पाहणी केली. या वेळी 400 मीटर क्षेत्रातील खारफुटीवर राडारोडा टाकल्याचे आढळले, असे बोडके यांनी सांगितले. या भेटीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. ही कत्तल करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कायद्यानुसार कपिल शर्मासह त्याच्या शेजाऱ्यांवरही फौजदारी कारवाई होऊन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्‍यता आहे. रो हाउसमध्ये दुरुस्तीसाठी महापालिकेचे कर्मचारी पाच लाखांची लाच मागत असल्याचे ट्विट कपिलने शुक्रवारी केले होते. मात्र, या बंगल्यात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने कारवाई केली असल्याचे समजले. त्यानंतर वन विभागाने कपिल आणि त्याच्या शेजाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळला आहे. 
 

पालिकेच्या पत्राला उत्तर नाही 
कपिलने ट्विट केल्यानंतर पालिकेच्या दक्षता विभागाने तत्काळ त्याला पत्र पाठवून त्याने आरोप केलेल्या अधिकाऱ्याचे नाव सांगावे, असे कळवले आहे. या पत्राला अद्याप कपिलकडून उत्तर आलेले नाही. पत्र दिल्यानंतर सलग सुट्या होत्या. सोमवार हा कामकाजाचा पहिला दिवस असल्याने त्याच्या उत्तराची वाट पाहत आहोत, असे दक्षता विभागाचे प्रमुख मनोहर पवार यांनी सांगितले.

Web Title: Kapil Sharma might have to face criminal charges