कऱ्हाड तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला झालेल्या मारहाणप्रकरणी त्या वेळी सेवेत असणाऱ्या कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक तथा तपास अधिकाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत केली. या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षकांच्या स्तरावर चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कॉंग्रेसचे आनंदराव पाटील, रामहरी रुपणवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला श्री. केसरकर उत्तर देत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत कऱ्हाड तालुक्‍यातील तांबवेजवळ श्री. पाटील यांचे वाहन आडवून त्यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या 25 ते 30 सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. या वेळी अंगरक्षक कऱ्हाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपण स्वतः पोलिस अधीक्षक आणि उप अधीक्षकांना संपर्क केल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांगरे यांनी फोन केल्यावर मी त्या ठिकाणी गेलो. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी आपणास दोन तास बसवून ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप पाटील यांना बोलवून घेऊन माझ्याविरोधात त्यांची तक्रार आधी घेण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. या स्पष्टीकरणाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार समर्थन दिले. कॉंग्रेसचे रामहरी रुपणवार, शरद पाटील, राष्ट्रवादीचे जयंतराव जाधव, शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृह अक्षरशः डोक्‍यावर घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी आनंदराव पाटील यांचाच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना श्री. केसरकर यांनी संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित करत असल्याची घोषणा केली.

या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षकांच्या स्तरावर चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.
- दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री