"केडीएमसी'च्या भरारीला कोरियन तंत्राचे बळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

कल्याण - स्मार्ट सिटीच्या अवकाशात भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पंखांना आता अत्याधुनिक कोरियन तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील हरित पट्ट्याच्या योजनेबरोबरच वाहतूक समस्येवरही कोरियाच्या लॅण्ड ऍण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीतर्फे स्मार्ट उपायांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

कल्याण - स्मार्ट सिटीच्या अवकाशात भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पंखांना आता अत्याधुनिक कोरियन तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील हरित पट्ट्याच्या योजनेबरोबरच वाहतूक समस्येवरही कोरियाच्या लॅण्ड ऍण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीतर्फे स्मार्ट उपायांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

पालिकेने रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्याला पूरक असा एक प्रकल्प कोरियाच्या अन्य एका कंपनीने रेल्वे मंत्रालयाकडे दिल्याची माहिती कोरियन सरकारचे सल्लागार विवेक विचारे यांनी दिली. कल्याण-डोंबिवली शहरात स्मार्ट सिटीमुळे होणारी रोजगार निर्मिती, आरोग्य; तसेच शैक्षणिक सुविधा यांचा लाभ या शहरांच्या सभोवतालच्या परिसरालाही होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि कोरियाच्या लॅण्ड ऍण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीदरम्यान गुरुवारी (ता.6) स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी विचारे बोलत होते. पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या करारानुसार ही कंपनी पालिकेला तांत्रिक साह्य; तसेच आर्थिक मदत करणार आहे. 

राज्यातील आठ पालिकांच्या प्रकल्प अहवालांचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने केडीएमसीची निवड केली आहे. पालिका आयुक्त ई. रवींद्रन; तसेच कोरियन कंपनीचे महासंचालक कॉंग कू हवॉंग यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात 2015 मध्ये झालेल्या करारानुसार कोरियन कंपनी देशातील पायाभूत सोई-सुविधांसाठी काम करणार आहे. या करारानुसार कोरियन सरकार भारताला दहा अब्ज अमेरिकन डॉलरचे अर्थसाह्य करणार आहे. 

पालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेला साह्यभूत होणारा प्रकल्प आराखडा या कंपनीने तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेली कंपनी यात आवश्‍यकतेनुसार बदल सुचवून हे काम करण्यासाठी दिशा निश्‍चित करील, अशी माहिती रवींद्रन यांनी दिली. शहराची भौगोलिक तसेच नैसर्गिक विस्तार क्षमता ओळखून कंपनीने येथील नियोजनाचा आराखडा तयार केल्याबद्दल महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्यांचे आभार मानले. 

50 स्मार्ट शहरांचा अनुभव 
1952 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी प्रथमतः जमिनी; तसेच गृहनिर्माण या दोन वेगळ्या क्षेत्रांत काम करत होती. कोरियन सरकारने त्या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करत लॅण्ड ऍण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना केली. कोरियातील 50 स्मार्ट शहरे बनवण्याचा अनुभव या कंपनीकडे आहे. त्यांच्याकडे आठ ते नऊ हजार मनुष्यबळ असून गरज पडल्यास ते एखादा प्रकल्पही राबवू शकतात. कोरियातील वाढत्या नागरिकीकरणात या कंपनीचा मोठा सहभाग असल्याचे विवेक विचारे यांनी सांगितले.