खाकी वर्दी पुन्हा बदनाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

हुपरी प्रकरणानंतर भ्रष्टाचार चव्हाट्यावर - दाद मागायची कोणाकडे?
कोल्हापूर - कैद्यांबरोबरची ओली पार्टी आणि आता पाच कोटी खंडणीच्या वसुलीत खाकी वर्दी अडकल्याने पोलिस दल पुन्हा बदनाम झाले आहे. कायद्याचे रक्षण करणारेच गुन्हेगारी चक्रात अडकल्याने पोलिस दलावर विश्‍वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

हुपरी प्रकरणानंतर भ्रष्टाचार चव्हाट्यावर - दाद मागायची कोणाकडे?
कोल्हापूर - कैद्यांबरोबरची ओली पार्टी आणि आता पाच कोटी खंडणीच्या वसुलीत खाकी वर्दी अडकल्याने पोलिस दल पुन्हा बदनाम झाले आहे. कायद्याचे रक्षण करणारेच गुन्हेगारी चक्रात अडकल्याने पोलिस दलावर विश्‍वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

पोलिस दलाचे "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय‘ हे ब्रीद आहे. कायदा-सुव्यवस्थेबरोबर गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलिस दलातर्फे केले जाते. सरासरी 10 हजार नागरिकांमागे एक पोलिस कर्मचारी, असे आज प्रमाण आहे. तुटपुंज्या मनुष्यबळावर काम करणाऱ्या पोलिस दलाचा यापूर्वी धाक होता. त्यांचा गुन्हेगारांवर वचक होता. सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या महिला पोलिस लैंगिक शोषण प्रकारामुळे पोलिस दल बदनाम झाले होते. यानंतर पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न झाला. त्याला काहीसे यशही आले. मात्र भ्रष्टाचाराचे ग्रहण कायम राहिले. गेल्या तीन वर्षांत पोलिस दलातील तब्बल 70 अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार व इतर कारणांमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. यात हुपरी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यापाठोपाठ 15 जूनला रात्री सीपीआरच्या कैदी वॉर्डात मोका लागलेल्या संशयिताबरोबर पोलिसांनी केलेल्या ओल्या पार्टीमुळे संपूर्ण जिल्हाच हादरला.

पार्टीत सहभागी झालेले सहायक फौजदार बाबूराव चौगुले (वय 56) आणि कॉन्स्टेबल मारुती पाटील या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. चौकशीअंती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी त्या दोघांना बडतर्फ केले. त्याचबरोबर मुख्यालयातील राखीव पोलिस दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वरेकर यांच्यासह बंदोबस्तासाठी नेमणूक असूनही गैरहजर असणाऱ्या दोघा पोलिसांना निलंबित केले. त्यांची तातडीने विभागीय चौकशीही सुरू केली. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या कडक कारवाईचे स्वागत नागरिकांतून करण्यात आले. या आठवणी ताज्या असतानाच पुण्यातील उद्योजक महिला व तिच्या मानलेल्या भावाकडे पाच कोटींची खंडणी मागून त्यांना लुटणाऱ्या टोळीत चक्क दोन पोलिस सहभागी असल्याचा धकादायक प्रकार काल उघडकीस आला. पाच कोटींसाठी त्या दोघांचे अपहरण करणे, त्यांना डांबून ठेवणे, अटक करण्याची धमकी देणे, 33 लाख रुपये जबरदस्तीने काढून घेणे, विनयभंग करणे अशा गंभीर गुन्ह्यांत हुपरी पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार संजय लोंढे आणि कॉन्स्टेबल बाबूमियॉं काझी अडकला. या पार्श्‍वभूमीवर चोरी, मारहाण, दरोडा अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांकडे दाद मागायची का, असा प्रश्‍न आज नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.