मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नियमावली तयार करणार

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नियमावली तयार करणार
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नियमावली तयार करणार

मुंबई - मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला असून, ही समिती या संदर्भात नियमावली तयार करेल. मूत्रपिंडदात्याची माहिती आधार कार्डाशी संलग्न करून ऑनलाइन माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे सांगितले. 

डॉ. सावंत म्हणाले की, "किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युरोलॉजिस्ट आणि नेफ्रॉलजिस्ट संघटनांच्या सदस्यांनी भेट घेऊन व्यथा मांडली होती. त्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय, न्युरोलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट आदी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती येत्या आठवडाभरात स्थापन करून पंधरा दिवसांत नियमावली तयार करण्यात येईल. 

मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि एकूणच अवयवदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होण्यासाठी आरोग्य विभागातर्फे रुग्णांमध्ये आणि अवयव दात्यांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथे एक विशेष कक्ष तयार करून मूत्रपिंड दाता आणि ते स्वीकारणाऱ्या रुग्णाला त्याच्या नातेवाइकांना मूत्रपिंड शस्त्रक्रियेची माहिती, परिणामांविषयी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येईल. तसेच संमतिपत्रदेखील तयार करून घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया या विशेष कक्षात "इन कॅमेरा‘ होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

मूत्रपिंडदात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून, त्या माध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डाशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया ऑनलाइन करून त्याद्वारे मूत्रपिंडदात्याची माहिती, मूत्रपिंड स्वीकारण्याऱ्या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित होईल व ती माहिती ऑनलाइन करण्यात येईल, या प्रक्रियेच्या माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. संबंधित रुग्णालयाकडून शस्त्रक्रियोत्तर माहिती घेऊन मूत्रपिंडदात्याची शस्त्रक्रियेनंतर तपासणी करून खात्री करण्यात येईल. 

ज्या रुग्णालयामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथील डॉक्‍टरांसाठी सातत्याने कार्यशाळा आयोजित करून प्रत्यारोपण कायदा त्यातील बदल आदीबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच याकामी मदत करणाऱ्या समन्वयकांचे देखील प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. 

राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयांना परवाने देण्यात आले असून यकृत प्रत्यारोपणासाठी, हृदय प्रत्यारोपणासाठी आणि फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना परवाने देण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com