बडोदा बॅंक दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद

बडोदा बॅंक दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद

कोपरखैरणे - जुईनगर येथील बडोदा बॅंकेवरील दरोडाप्रकरणी मुख्य सूत्रधाराला काल रात्री हावड्याजवळच्या नळपूर (पश्‍चिम बंगाल) गावात अटक करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली. या कारवाईबाबत पोलिसांनी मात्र कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यांनी या संदर्भात कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. मोईन सिराज शेख ऊर्फ मियॉं (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ऍण्टॉप हिल (मुंबई) येथील किस्मतनगरमध्ये राहत होता. दरोड्यानंतर तो आपल्या मूळ गावी हावडा येथे पळून गेला होता, असेही सूत्रांनी सांगितले.

सानपाडा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीवरून मुख्य सूत्रधाराचा माग काढण्यात आला. पोलिस आपल्या मागावर असल्याच्या भीतीने मोईन सिराज शेख ऊर्फ मियॉं याने हावड्यातून पळ काढला होता; परंतु गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला हावड्यानजीकच्या नळपूर गावातून जेरबंद केले. तो एका नातेवाइकाच्या घरी लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून, त्याच्या मुसक्‍या आवळल्या.

पोलिसांनी त्याला हावडा येथील त्याच्या घरी आणून घराची झडती घेतली असता, तेथे सात लाख रुपयांची रोकड सापडल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याला स्थानिक न्यायालयाकडून हस्तांतर कोठडी मंजूर करून नवी मुंबईत आणण्यात आले आहे.

जुईनगर सेक्‍टर 11 येथील बडोदा बॅंकेवर मागील आठवड्यात दोन कोटी नऊ लाखांचा दरोडा पडला होता. बॅंकेपासून सुमारे 50 फुटांवर असलेल्या एका दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी बॅंकेचे तीन लॉकररूम फोडले होते.

पोलिस तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात आताच बोलणे योग्य नाही. योग्य वेळी याची माहिती देण्यात येईल.
- हेमंत नगराळे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com