ललिता साळवेंवर आज लिंगबदल शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - बीड जिल्ह्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर शुक्रवारी सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया होणार आहे. शारीरिक चाचण्या झाल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच साळवे यांना या शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली होती.

ललिता यांच्यावर सेंट जॉर्जेस रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन डॉ. रजत कपूर शस्त्रक्रिया करणार आहेत. ललिता यांचा जन्म मुलगा म्हणूनच झाला होता; मात्र पुरुषांप्रमाणे त्यांच्या जननेंद्रियांची वाढ झाली नाही, त्यामुळे त्यांना मुलगी म्हणूनच समजले गेले होते. त्यांच्या जननेंद्रियावर शुक्रवारी पहिली शस्त्रक्रिया होईल, अशी माहिती डॉ. कपूर यांनी दिली.

खर्च सरकारच करणार
साळवे यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी पाच ते सात लाख रुपये खर्च होणार आहे. त्या सरकारी अधिकारी असल्याने सरकारकडून परताव्याच्या रकमेतून शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जाईल. शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी सेवाभावी संस्थांचीही मदत घेतली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

Web Title: lalita salve today penis changes surgery