वकील - पोलिसांनी एकमेकांचा आदर राखावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबई - वकील व पोलिसांनी परस्परांचा आदर राखणे आवश्‍यक आहे. त्यांनी आपापसांत वादावादी करू नये, अशा सूचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत. 

मुंबई - वकील व पोलिसांनी परस्परांचा आदर राखणे आवश्‍यक आहे. त्यांनी आपापसांत वादावादी करू नये, अशा सूचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत. 

दक्षिण मुंबईतील वकील महिला आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्यातील वादाच्या प्रकरणावर न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. ऍड. वंदना बेहरे (नाव बदलले आहे) या त्यांची गाडी पोलिस ठाण्यासमोर पार्क करतात. त्या तेथे एक तात्पुरती शेडही बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याबाबत बेहरे यांना माहीम पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यात बाचाबाची झाल्याने बेहरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि ती रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. 

न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. तक्रारदार व आरोपी या दोघांनीही घेतलेल्या कठोर भूमिकेबाबत खंडपीठाने खेद व्यक्त केला. दोघांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून वाद होऊन पोलिस तक्रार होणे गैर आहे. फौजदारी प्रकरणातील न्यायदानामध्ये पोलिस, वकील, सरकारी वकील व न्यायालये यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या चारही जबाबदार क्षेत्रांनी एकमेकांचा आदर ठेवण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी वादावादी करू नये, अशा सूचना खंडपीठाने केल्या. न्यायदानासाठी वकील, पोलिस व न्यायालयांमध्ये समन्वय आवश्‍यक असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांकडे आरोप सिद्ध होण्याइतपत पुरावे सकृतदर्शनी दिसत नाहीत, असे मत नोंदवून न्यायालयाने बेहरे यांच्याविरोधातील फिर्यादही रद्द करण्याचे आदेश दिले.