मुंबईत लवकरच डाव्यांची महाआघाडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची यावरून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष लपून राहिलेला नसताना, डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पक्षांची मते फुटू नये यासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबई : मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची यावरून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष लपून राहिलेला नसताना, डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पक्षांची मते फुटू नये यासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

शेतकरी कामगार पक्षांचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पक्ष, लोकभारती यांच्यासह एक विचारधारा असलेल्या पक्षांनी निवडणुकीत युती करावी, यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे समजते. मुंबई महापालिकेत आतापर्यंत शेकापचा नगरसेवक निवडून आला नसला तरी, मुंबई महापालिकेच्या निकालाचा परिणाम राज्यात होतो. त्यामुळे, या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांची मोट बांधल्यास ताकद निर्माण होईल, अशी भावना चळवळीत काम करणाऱ्या तळागळातील कार्यकर्त्याची असते.

नेमका हाच धागा पकडून जयंत पाटील यांनी अन्य समविचारी पक्षांशी बोलणी सुरू केल्याचे समजते. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने, पुन्हा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांमध्ये फूट पडणार असल्याचे महापालिका वर्तुळातून सांगणार येते. रामदास आठवले यांच्या पुढाकाराने 2009 पूर्वी रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी (रिडालोस) स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी आठवले यांच्यासोबत प्रताप होगाडे, प्रभाकर नारकर, भालचंद्र कांगो, किशोर ढमाले आदी नेते होते. 

आघाडीनंतर महाआघाडी 
2009 मधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आठवले यांनी युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने रिडालोसमध्ये फूट पडली. त्यानंतर डावी लोकशाही आघाडी करून समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षांनी आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच 2012 च्या महापालिका निवडणुकीत मुंबई विकास आघाडीच्या झेंड्याखाली समाजवादी पक्ष, लोकजनशक्ती, राष्ट्रीय जनता दल, जनता दल ( सेक्‍युलर) आदी पक्ष एकत्र लढले होते. परंतु, पुन्हा एकदा मुंबईमध्ये महाआघाडी करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला आहे. परंतु, ही प्राथमिक बोलणी असल्याचे शेकापच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: leftist alliance soon in mumbai