कुत्रा समजून बिबट्याने मुलाला उचलले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुलाचे प्राण वाचवणारी आई म्हणते, बिबट्या नव्हे; प्रशासन दोषी

मुलाचे प्राण वाचवणारी आई म्हणते, बिबट्या नव्हे; प्रशासन दोषी
मुंबई - जंगली प्राण्यांच्या सहवासात राहण्यास सरावलेली माणसे त्यांच्याबाबत किती सहृदय असतात, हे ठळकपणे दर्शवणारी एक घटना घडली. आरे वसाहतीतील चाफ्याचा पाडा येथे सोमवारी रात्री कुत्रा समजून बिबट्याने तीन वर्षांच्या लहान मुलाला पकडले. जवळच असलेल्या मुलाच्या आईने आरडाओरड करताच बिबट्याने त्याला सोडून पळ काढला. त्या माऊलीने मुलाला पोटाशी धरले आणि सुटकेचा निःश्‍वास सोडला. अंधार असल्याने बिबट्याने कुत्रा समजून माझ्या बाळाला पकडले, असे तिने सांगितले.

चाफ्याचा पाडा ही आदिवासींची वस्ती आहे. येथे पुरेशी शौचालये नाहीत. रस्त्यांवर दिवेही नाहीत. सोमवारी रात्री प्रमिला वासुदेव रिंजड ही महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडली. प्लॅस्टिकचा आडोसा करून तयार केलेल्या शौचालयात जाताना तिने प्रणय या तिच्या तीन वर्षाच्या मुलाला जवळच थांबण्यास सांगितले. ती बाहेर येत असतानाच बिबट्याने प्रणयला उचलल्याचे तिला दिसले. आपल्या पोटचा गोळा बिबट्याने उचललेला पाहताच ती माऊली आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धावू लागली. काही अंतरावर बिबट्याने प्रणयला सोडले. बिबट्याला तो मुलगा असल्याचे समजले नाही. कुत्रा असल्याचे समजून त्याने त्याला उचलले, असे तिने सांगितले. बिबट्याला निर्दोष ठरवत तिने आदिवासी पाड्यांमध्ये पुरेशा सुविधा न पुरवणाऱ्या आरे प्रशासनालाच जबाबदार ठरवले आहे.

आम्ही कित्येक वर्षांपासून जंगलात राहतो. आदिवासी पाड्यांत बिबट्यांचे हल्ले होत नाहीत. आवश्‍यक ती काळजी आम्ही घेतो. त्याच्या जगण्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे तेही आमच्यापासून दूर राहतात, असे तिने सांगितले.

बिबट्या आमचा देव आहे. पुरेशी काळजी घेतली तर बिबट्याचा हल्ला मानवी समूहावर होत नाही. आतापर्यंतच्या घटनांमध्ये बिबट्यांनी केवळ कुत्रे समजूनच माणसांवर हल्ला केला आहे.
- प्रकाश भोईर, आदिवासी कार्यकर्ते

आम्ही आरे वसाहतीतील पाड्यांत रात्री वन अधिकारी पाठवून टेहळणी करणार आहोत. आदिवासींनी आवश्‍यक सूचनांचे पालन करावे.
- सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, ठाणे वनविभाग (प्रादेशिक)

Web Title: leopard picked child