दारूची दुकाने गावकुसाबाहेर नेणार - बावनकुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - गावातील दारू दुकानांच्या बाजूला तळीरामांचा होणारा घोळका. आजूबाजूला शाळा, धार्मिक स्थळे, महिलांना होणारा त्रास आदी सर्व बाबी लक्षात घेता हे कायमचे बंद करण्यासाठी आता दारू दुकाने गावकुसाबाहेर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई - गावातील दारू दुकानांच्या बाजूला तळीरामांचा होणारा घोळका. आजूबाजूला शाळा, धार्मिक स्थळे, महिलांना होणारा त्रास आदी सर्व बाबी लक्षात घेता हे कायमचे बंद करण्यासाठी आता दारू दुकाने गावकुसाबाहेर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्या गावातील ग्रामसभा 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतांनी याबाबतचा ठराव मंजूर करेल, अशा गावातील दारू दुकाने गावाच्या बाहेर लोकवस्तीपासून किमान 100 मीटर दूर स्थलांतरित करण्यात येतील, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फक्‍त ग्रामीण भागासाठीच हा निर्णय लागू असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात 1973 मध्ये देशी दारू दुकानांचे परवाने देण्यात आले असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, " गावठाणांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. दारू दुकानांच्या आसपास लोकवस्ती वाढली. शाळा, धार्मिक स्थळे उभारण्यात आली. लोकवस्ती वाढल्यामुळे दारूच्या दुकानांचा महिला, लहान मुले आदींना होणारा त्रासही वाढला. यामुळे आपल्याकडे तसेच मुख्यमंत्री स्तरावर या दारू दुकानांबाबत निर्णय घेण्यासाठी अनेक तक्रारी आल्या होत्या. दुकान पूर्णपणे बंद करण्यात आले तर मग अवैध दारूचा धंदा वाढतो. यामुळे आता ज्या गावातील ग्रामसभा 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतांनी अशा प्रकारे दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर नेण्याचा ठराव मंजूर करेल तेथील दारू दुकान त्या गावाच्या हद्दीबाहेर नेणे बंधनकारक राहील.'

गावाच्या हद्दीतील शेवटच्या घरापासून किमान शंभर मीटर लांब हे दुकान स्थलांतरित करणे आवश्‍यक राहणार आहे. दारू दुकानदाराने स्थलांतराची ही कारवाई एका वर्षाच्या आत न केल्यास त्याचा दारू दुकानाचा परवाना आपोआपच कायमचा रद्द होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

दोन बाटल्या बाळगण्याची परवानगी
वैयक्‍तिक मद्य परवान्यावर 12 बाटल्या बाळगण्याची मुभा आहे. मात्र, याचा गैरफायदा घेतल्याचे दिसून येते. 12 बाटल्या स्वतःच्या घ्यायच्या आणखी 12 बाटल्या अवैध जमवायच्या व त्याचे छोटे दुकान टाकून ती दारू छोट्या बाटल्यांमधून विकायची असे प्रकार घडत असल्याचे दिसून आले. याला आळा घालण्यासाठी आता वैयक्‍तिक मद्य परवान्यावर 12 ऐवजी केवळ दोनच बाटल्या बाळगण्याची मुभा मिळणार आहे. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

हजारे यांच्या सूचनेचे पालन
दारूमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास ताबडतोब थांबविण्याच्या सूचना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला केल्या होत्या. त्यातील बहुतांश सूचनांचे सरकारने पालन केले आहे. अवैध दारूला रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे. अवैध दारूची वाहतूक करताना जर तिसऱ्यांदा अटक झाली तर कठोर शिक्षा करावी, अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन सरकारजमा करणे आदी मागण्या अण्णा हजारे यांनी केल्या होत्या. याबाबत गृह तसेच विधि व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.