'लाईव्ह' आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. त्यासाठी फेसबुकने एक टीमही सज्ज ठेवली आहे.

फेसबुकने "क्रायसिस सपोर्ट ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून "मॅसेंजर लाईव्ह चॅट'ची सेवा उपलब्ध केली आहे; मात्र फेसबुक लाईव्हवर काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकने हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

एखादा वापरकर्ता फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळल्यास त्याच्या मित्रांना त्याबाबत "ऍलर्ट' करणे या तंत्रज्ञानामुळे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची माहिती देणाऱ्यांना फेसबुककडून मदतही देण्यात येणार आहे. फेसबुकने त्यासाठी एक व्हिडीओ कॅम्पेनही लॉंच केले आहे. मशीनच्या माध्यमातूनही अशा पोस्ट शोधून काढण्याची प्रणालीही फेसबुकने विकसित केली आहे.

वापरकर्त्यांची मोठी संख्या पाहता अधिकाधिक संस्थांनाही या उपक्रमाशी जोडून घेण्याचा फेसबुकचा मानस आहे.

जगभरात प्रत्येक सेकंदाला सरासरी 42 आत्महत्या होतात. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 29 या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक असते.