प्रवाशांनीही दाबला लोकलचा ब्रेक

प्रवाशांनीही दाबला लोकलचा ब्रेक

रेल्वेचा दावा; साखळी खेचण्यात आघाडी, वर्षात 2336 घटना
मुंबई - मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाबरोबर लोकलच्या लेटमार्कला प्रवाशांसह इतर कारणेही जबाबदार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यात प्रवाशांनी यंदा अनावश्‍यक कारणांसाठी 2336 वेळा लोकलमधील साखळी खेचली. ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत वाढल्याने लोकलच्या वक्तशीरपणावर त्याचा परिणाम झाला. याशिवाय रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे फाटक सुरू ठेवणे व प्रवाशांच्या आंदोलनाची भर पडल्याने लोकलच्या वेगाला ब्रेक लागला आहे.

मध्य रेल्वेच्या लोकलला तांत्रिक कारणामुळे फटका बसलाच; पण ज्या गोष्टी नियंत्रणाच्या पलीकडे होत्या व प्रवाशांच्या आंदोलनामुळे लेटमार्कमध्ये भर पडली. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 111 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्या, तर तब्बल 2400 पेक्षा जास्त फेऱ्यांचे वेळापत्रक विसकटले. एप्रिल ते नोव्हेंबर 2015 मध्ये या कालावधीत 15 हजार 758 फेऱ्या उशिरा धावल्या. यंदा हा आकडा 18 हजार 228 एवढा आहे. गेल्या वर्षी रद्द फेऱ्यांचा आकडा 903 होता, तर यंदा 1014 सेवा रद्द झाल्या. त्यात रेल्वे फाटक जास्त वेळ उघडे राहणे, रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, प्रवाशांचे आंदोलन, आणीबाणीच्या परिस्थितीत ओढण्यासाठीची साखळी ओढणे आदी गोष्टींचा समावेश आहे.

कोणत्याही ठोस कारणाशिवाय साखळी खेचण्याचे प्रमाणही मध्य रेल्वेवर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. गेल्या वर्षी साखळी खेचल्यामुळे दिरंगाई झालेल्या फेऱ्यांची संख्या एक हजार 991 होती. यंदा ती वाढली आहे, यामुळे यंदा 59 फेऱ्या रद्द झाल्या. रेल्वेकडून होणाऱ्या तांत्रिक बिघाडांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनीही रेल्वेची बाजू समजून घेऊन सहकार्य करायला हवे. एकत्रित प्रयत्नातून ते सहज शक्‍य आहे.
- रवींद्र गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

रेल्वे फाटकांचा अडथळा
प्रवासी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक गोयल यांनी रेल्वे फाटक गर्दीच्या वेळेत बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्याला संघटनेने तीव्र विरोध केला होता; मात्र दिवा, कळवा, ठाकुर्ली आणि शहाड येथील रेल्वे फाटक अधिक वेळ सुरू राहिल्याने लोकलच्या लेटमार्कमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. रस्ते वाहतूक वाढल्याने फाटकांचा अवधी चार मिनिटांहून सात मिनिटांपर्यंत गेला आहे. हा अवधी दहा मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत गेला आहे. यामुळे प्रतिदिन 50 पेक्षा जास्त फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडते.

वेगमर्यादा
रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी वेगमर्यादा लावल्या आहेत. त्यात रेल्वेच्या तांत्रिक कारणांबरोबरच प्रवासी व रेल्वेमार्गांच्या बाजूला असलेले रहिवासी यांचाही हात आहे. विक्रोळी, डोंबिवली, पारसिक, गोवंडी, वडाळा आदी ठिकाणी बाहेरून रेल्वेमार्गावर पडलेल्या कचऱ्यामुळेही वेगमर्यादा लावावी लागली आहे. वेगमर्यादांमध्ये रेल्वेचा वाटा 60 टक्‍क्‍यांचा असला, तरी 40 टक्के फेऱ्या बाह्य गोष्टींमुळे रद्द किंवा खोळंबतात.

कारणे काय दिरंगाई रद्द फेऱ्या
2015 2016 2015 2016
रेल्वे फाटक 8326 9024 492 476
वेगमर्यादा 3797 5435 91 191
साखळी खेचणे 1991 2366 54 59

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com