मोबाईल स्कॅन करून लोकलचे तिकीट मिळवा!

सुशांत मोरे
गुरुवार, 11 मे 2017

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या स्थानकांवर नवीन एटीव्हीएम सेवा

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या स्थानकांवर नवीन एटीव्हीएम सेवा
मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर मोबाईल तिकीट सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर आता प्रवाशांच्या सोईसाठी बदल केले जात आहेत. सध्या मोबाईल प्रिंट तिकीट सुविधा असून मोबाईलवर तिकीट काढल्यानंतर स्थानकातील "एटीव्हीएम'मधून तिकिटाची प्रिंट मिळवता येते. मात्र त्यासाठी एटीव्हीएममध्ये अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. यातून सुटका व्हावी आणि प्रवाशाला त्वरित तिकीट मिळावे यासाठी मोबाईल स्कॅन करून तत्काळ तिकिटाची प्रिंट देणारे नवीन एटीव्हीएम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या "क्रिस'कडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) याविषयीचे काम सुरू असून मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या प्रत्येकी पाच स्थानकांवर एटीव्हीएम यंत्रे बसवली जातील.

2015 च्या अखेरीस मुंबई उपनगरी लोकल प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली. स्मार्ट फोनवर उपलब्ध असलेल्या या सेवेत रेल्वेच्या मोबाईल ऍपमधून तिकीट काढताच मोबाईलवर तिकिटाची माहिती व कोड नंबर येतो. रेल्वेस्थानकात जाताच फलाटावरील एटीव्हीएम यंत्रात मोबाईल नंबर आणि मोबाईलवरच आलेला कोड नंबर टाकल्यानंतर तिकिटाची प्रिंट मिळते. हे करताना एटीव्हीएम यंत्रावर बऱ्याच प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यात वेळही वाया जातो.

रेल्वेच्या "क्रिस' या केंद्राने यात बदल करत प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधाही काही महिन्यांपूर्वी सुरू केली. परंतु जीपीएस यंत्रणेत येणारे अडथळे आणि या मोबाईलवरील दोन्ही सुविधांना सुरुवातीपासूनच मिळत असलेला कमी प्रतिसाद पाहता पुन्हा नवीन एटीव्हीएम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी प्रथम पश्‍चिम रेल्वेच्या पाच आणि नंतर मध्य रेल्वेच्या पाच स्थानकांवर प्रत्येकी 25 एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात येतील. दोन्ही रेल्वे प्रशासनाकडून स्थानकेही निश्‍चित केली जातील आणि त्यानंतरच एटीव्हीएम बसवली जातील.

"क्रिस'चे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे मोबाईलवर तिकीट काढताना काही वेळा मोबाईलवर नेटवर्क आणि जीपीएसमध्ये अडथळे येत असतात. त्यामुळे पेपरलेस मोबाईल तिकिटांऐवजी प्रिंटचा पर्यायच प्रवासी निवडतात आणि स्थानकात आल्यानंतर एटीव्हीएममधील प्रक्रिया पार पाडून प्रिंट मिळवता येते. परंतु यात वेळही जातो. हे पाहता मोबाईलवरील तिकिटाची माहिती स्कॅन करून प्रिंट देणारे यंत्र बसवण्यात येणार आहे. हे यंत्र भिंतीवर बसवण्यात येईल. त्याचा आकार सध्याच्या एटीव्हीएमपेक्षा लहान असेल. महिनाभरात ही यंत्रे बसवण्यात येतील. मोबाईलवर आलेल्या आयआर कोडद्वारे मोबाईल स्कॅन करता येईल.