कलगीतुरा निवडणुकीपुरता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कल्याण-डोंबिवलीमधील कलगीतुराही असाच तात्पुरता ठरला होता...

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक भाषणात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तरीही भाजपकडून शिवसेनेवर कठोर टीका केली जात नसल्याचे दिसते. त्यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी पालिकेच्या निवडणुकीनिमित्त सुरू असलेले आमचे भांडण तात्पुरते असल्याचा दावा केला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील कलगीतुराही असाच तात्पुरता ठरला होता. ठाण्यातील अनेक गुंडांना अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना भाजपकडून लाल गालिचा अंथरला जात आहे. शिवसेनेकडूनही या विषयावरून भाजपला लक्ष्य केले जात आहे. अशा वेळी भाजपची भूमिका मांडण्यासाठी थेट राज्यस्तरीय प्रवक्ते भंडारी ठाण्यात आले होते.

शिवसेनेने भाजपवर गुंडगिरीचा आरोप करताना थेट दाऊदलाही भाजप बोलावून घेईल, असा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, शिवसेना धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नसल्याची टीका भंडारी यांनी केली. ठाण्यात शिवसेनेने गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे २० उमेदवार दिल्याचे सांगितले. पूजा करसुले या कुप्रसिद्ध राजा गवारी यांच्या बहिणीलाही उमेदवारी दिली आहे. दिलीप बारटक्के यांच्यावर गुन्हे दाखल असून, जयश्री डेव्हिड यांचा पती जेरी डेव्हिड हा तर डी. के. राव याचा जवळचा असल्याचा आरोप केला. माणिक पाटील ज्याने प्रचारासाठी आपल्याच पत्नीच्या डोक्‍यात नारळ फोडला. शर्मिला गायकवाड यांचा पती रोहित याच्यावरही गुन्हे असल्याचे सांगत अशा २० गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याचे भंडारी यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असलेल्या मयूर शिंदे याचा भाजपशी काहीही संबंध नाही. त्याने पक्षात प्रवेश केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: madhav bhandari in thane