मधु कांबीकर यांची प्रकृती अत्यवस्थ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मुंबई - लोककलावंत, अभिनेत्री मधु कांबीकर या रविवारी (ता.27) "लावण्य संगीत' या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बेशुद्ध झाल्या. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

मुंबई - लोककलावंत, अभिनेत्री मधु कांबीकर या रविवारी (ता.27) "लावण्य संगीत' या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बेशुद्ध झाल्या. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

लावण्य संगीत या लावणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मधु कांबीकर 10 ते 12 वर्षांनंतर लावणी सादर करणार होत्या. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची जोरदार तालिमही सुरू होती. वयाच्या साठीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करताना त्यांच्यावर काहीसा ताण होता. मात्र त्यांची जिद्द मोठी होती. "यशवंत नाट्यमंदिर'मध्ये लावणीचा हा कार्यक्रम सादर केल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या होत्या. उपचारासाठी त्यांना तातडीने परळमधील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर प्राथमिक चाचण्या केल्यानंतर मधु कांबीकर यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या काही गाठी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उपचाराला त्या चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मधु कांबीकर यांची बहीण रत्ना हेगडे यांनी दिली.