सामंजस्य करारांतील अडचणी दूर करण्यासाठी "महामैत्री'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

ई-मेलद्वारे अधिकाऱ्यांशी थेट संपर्क शक्‍य

ई-मेलद्वारे अधिकाऱ्यांशी थेट संपर्क शक्‍य
मुंबई - "कौशल्य विकास'अंतर्गत येणाऱ्या सामंजस्य करारांतील अडचणी दूर करण्यासाठी "महामैत्री' नावाचा ई-मेल आयडी सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. या स्वतंत्र "ई-मेल आयडी'वर उद्योग संस्था थेट या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचणी मांडू शकतील.

महामैत्रीमुळे उद्योजकांना सामंजस्य कराराची (एमओयू) अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे शक्‍य होईल.

mahamaitri.sded@maha.gov.in या "मेल आयडी'अंतर्गत करारांवर स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री पाटील-निलंगेकर आणि प्रधान सचिव दीपक कपूर करतील. फेब्रुवारी 2016 पासून 61 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यातील 57 करारांवर प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. करारांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासोबत संबंधित कंपन्यांकडून आलेल्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. आलेल्या "ई-मेल'वर कोणती कार्यवाही झाली, याचा आढावा घेण्यासाठी व्यावसायिक आणि सरकार या दोघांची एकत्रित समिती स्थापन करण्यात येईल. सामंजस्य कराराच्या सद्यःस्थितीबाबतचा आढावा समितीच्या बैठकीत घेतला जाईल.

राज्य सरकार आता उद्योग क्षेत्राला आवश्‍यक असलेला अभ्यासक्रम युवकांना शिकवण्यावर भर देणार आहे. उद्योग संस्थांतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही करिअर मार्गदर्शन कार्यक्रम प्राथमिक स्तरावर नागपूर व लातूर या जिल्ह्यांत हाती घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी 20 कोटी
राज्यातील 145 प्रशिक्षण संस्थांमार्फत 25 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी तब्बल 20 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात टाटा ट्रस्ट, फोक्‍सवॅगन, सिस्को, सीमेन्स, वाधवानी, कोकण रेल्वे या भागीदारांचा सहभाग असून, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी रुस्तुमजी, कोहिनूर व जावेद हबीब हे ब्रॅंड सरकारला मदत करणार आहेत.