आयफोनसाठी दिल्या खेळण्यातील नोटा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - खेळण्यातील नोटा देऊन आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न सतरा वर्षांच्या एका युवकाने केला. त्याला आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. 

मुंबई - खेळण्यातील नोटा देऊन आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न सतरा वर्षांच्या एका युवकाने केला. त्याला आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. 

कल्याण येथे राहणाऱ्या या युवकाने "ओएलएक्‍स' या खरेदी-विक्री करण्याच्या संकेतस्थळावर आयफोन विकण्याची जाहिरात पाहिली होती. त्याने मोबाईल विकणाऱ्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने किमत 30 हजार रुपये सांगितल्यावर सीएसटी परिसरातील डी. एन. नगरात भेटण्याचे ठरले. मोबाईल विकत घेणाऱ्या युवकाने कल्याणमधील एका दुकानातून खेळण्यातील दोन हजारांच्या नोटा खरेदी केल्या. गुरुवारी तो मोबाईल विकणाऱ्याला भेटला. मोबाईल घेऊन त्याने 30 हजार रुपये म्हणून दोन हजारांच्या खेळण्यातल्या नोटा दिल्या. तो तेथून काही अंतरावर गेला असतानाच मोबाईल विकणाऱ्याला शंका आली. त्याने जाब विचारल्यावर तो युवक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच वेळी तिथे आझाद मैदान पोलिस ठाण्यातील एक पोलिस गस्त घालत होता. त्याने या फसवणूक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. नंतर गुन्हा दाखल करून युवकाला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत वखारे यांनी सांगितले, की इतरांकडे एखादी वस्तू पाहिली तर ती आपल्याकडे असावी, असे अनेकांना वाटते. या मुलालाही आपल्याकडे आयफोन असावा असे वाटत होते, पण पुरेसे पैसे नसल्याने त्याने ही फसवणूक केली.