मोहन आगाशे यांना थेप्सो जीवनगौरव 

मोहन आगाशे यांना थेप्सो जीवनगौरव 

मुंबई - अमेरिका, ग्रीक, ब्राझील, श्रीलंका, पाकिस्तान आदी देशांतील नाटकांबरोबरच इस्लामपूर, सांगली, लखनौ, अमृतसर, जयपूर, बडोदा येथील नाटके पाहण्याची संधी थेप्सो नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. तसेच, अलेक पदमसी, जेस थोर्पे, कार्ल अल्फान्सो, मॅथ्यू वासेर आदी नाट्यक्षेत्रातील मुरब्बी व्यक्तींचे मार्गदर्शनही या नाट्यमहोत्सवात तरुणांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. 18 ते 24 डिसेंबरदरम्यान जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये हा महोत्सव होईल. नाट्यक्षेत्रात अनन्यसाधारण योगदान दिलेल्या व्यक्तिमत्त्वाला थेप्सो जीवनगौरव पुरस्कार देऊन दर वर्षी सन्मानित करण्यात येते. यंदा मराठी रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण योगदान दिलेले ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 24 डिसेंबरला "एनसीपीए'मध्ये हा समारंभ होणार आहे. 

नाट्य चळवळीसाठी पाठबळ मिळावे, यासाठी एक दिवसाच्या या "थेप्सो'चे आठ दिवसांच्या महोत्सवात रूपांतर झाले. ग्रामीण पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचे नाट्यवैविध्य या महोत्सवात नाट्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. नाट्यवेड्या तरुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी या महोत्सवात 25 वर्षांखालील तरुणांना सहभागी करून घेतले जाते. यंदाच्या महोत्सवात 141 नाटके, 41 पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, बंगाली, तमीळ, मल्याळम, हरियानवी, कन्नड, तेलुगू आदी विविध भाषांतील नाटकांचे प्रयोग होणार आहेत. मुंबई, दिल्ली, जयपूर, पुणे आदी ठिकाणी ऑडिशन्स घेऊन नाटकांची निवड समितीने केली आहे. 

विनामूल्य प्रवेश 
नगरमधील "निर्मिती' या संस्थेचे "खतरा' हे नाटक महोत्सवात सादर होणार आहे. आरोग्यसेवेवर भाष्य केलेले "चेक अप' हे मराठी नाटकही या महोत्सवात होणार आहे. मुंबईतील जिब्रो यांचा लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स आणि "सायलेंट'सारखी पथनाट्येही सादर होणार आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा नाट्यानुभव घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने यावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून प्रवेश विनामूल्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com