महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 18 कंपन्यांच्या निविदा पात्र - राधेश्‍याम मोपलवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 700 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गाच्या 13 पॅकेजेसच्या बांधकामासाठी अर्हताप्राप्त कंत्राटदारांच्या वित्तीय निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे आज उघडण्यात आल्या. त्यात बांधकामासाठी 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत, असे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी सांगितले; तसेच येत्या दोन आठवड्यांत समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोपलवार म्हणाले, की आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमानुसार महामार्गाची उभारणी करण्यात येईल. महामार्गाच्या उभारणीसाठी 16 पॅकेजेसमध्ये या प्रस्तावित या द्रुतगती महामार्गाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यातील 13 पॅकेजेससाठी अर्हताप्राप्त कंत्राटदारांकडून वित्तीय निविदा मागविण्यात आल्या होत्या. उर्वरित तीन पॅकेजेससाठी वित्तीय निविदांचे काम प्रगतिपथावर आहे.

सरकारने सद्यस्थितीत समृद्धी द्रुतगती महामार्गासाठी आवश्‍यक असलेल्या एकूण जमिनीपैकी 80.25 टक्के जमीन खरेदी केली आहे; तसेच एकंदर चार हजार 788 कोटी रुपये भरपाईच्या स्वरूपात लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.
- राधेश्‍याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

Web Title: maharashtra samruddhi highway tender radheshyam mopalwar