उपेक्षित महिलांसाठी साहित्य हे अक्षर चळवळ ठरावे

उपेक्षित महिलांसाठी साहित्य हे अक्षर चळवळ ठरावे

मुंबई -  बलात्कारित मुली-स्त्रियांच्या मागे उभे राहण्याची, त्यांचे सामर्थ्य वाढविण्याची जशी गरज आहे, तशीच एकल पालकत्व, परित्यक्ता, कुमारी माता, घटस्फोटिता, विधवांसाठी अक्षर चळवळ चालवून जनजागृती करण्याची व संकटकाळात त्यांना आश्वासक साथ देण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. विजया वाड यांनी केले.

स्त्री सन्मान राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

ऋजुता फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाले. डॉ. विजया वाड म्हणाल्या, की ‘उपेक्षित महिलांशी हृदयाचे नाते जोडून त्यांच्या व्यथा त्यांच्या शब्दांत मांडून त्या समाजापुढे आणण्यासाठी अक्षर चळवळ साहित्यातून उभी राहावी. एकट्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा विकास हा राष्ट्राचे सामर्थ्य एकांगी करतो. त्यामुळे समाजात स्त्री-पुरुषांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, पुरुषजातीला ब्लॅकमेल करण्यासाठी आपला जन्म नाही, स्त्री विवाहाने दोन घरे जोडते, हे सारे साहित्यातून उमटले पाहिजे. साहित्य उमेद वाढविणारे असावे, जगणे माणसाचे असावे नि एक-दुसऱ्यास गरज पडल्यास ते मदतीसाठी सरसावून उठावे, याचेही प्रतिबिंब साहित्यातून उमटल्यास एक सक्षम समाजनिर्मिती होऊ शकेल. त्याचबरोबर साहित्याची आवड जनमानसात निर्माण करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.’

सुप्रसिद्ध साहित्यिका गिरिजा कीर यांना स्त्री सन्मान पुरस्कार देण्यात आला; तर साहित्यातील विशेष योगदानाबद्दल माधवी कुंटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. सत्काराला उत्तर देताना गिरिजा कीर यांनी एका कथाकथनाद्वारे आपल्या कृतज्ञतापर भावना व्यक्त केल्या. स्वागताध्यक्षा अनघा राणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा संमेलनाला अधिकाधिक प्रोत्साहित करण्याची व महिलांनी अधिकाधिक लिखाण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक ऋजुता फाऊंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांनी केले. साहित्यिका रेखा नार्वेकर यांनी वेदकालीन महिला तसेच संत साहित्यातील स्त्री प्रतिमा या विषयावरील विश्‍लेषण केले.
गरज स्त्रीचे आत्मभान जागृत करणाऱ्या साहित्याची, या विषयावरील परिसंवादात डॉ. मंजूषा कुलकर्णी, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. वीणा सानेकर व प्रियवंदा कारंडे यांनी विचार व्यक्त केले. स्त्रीला आचार-विचार आणि उच्चाराचे स्वातंत्र्य आहे का, या विषयावरील परिसंवादात डॉ. वसुधा वैद्य, डॉ. नीलिमा पुराणिक, शिल्पा खेर यांनी सहभाग घेतला. डॉ. उषा मेहता यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात मोहना कारखानीस (सिंगापूर), ज्योत्स्ना राजपूत, उषा परब, फरझाना डांगे, माया धुप्पड, पल्लवी बनसोडे, रेश्‍मा कारखानीस, सुमन नवलकर, नेहा भांडारकर, सुवर्णा जाधव या कवयित्रींनी सहभाग घेतला. यानंतर आध्यात्मिक विषयावरील अभ्यासक डॉ. उषा देशमुख, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील डॉ. मंजूषा दराडे, अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या बीड येथील कावेरी नागरगोजे, मुंबईच्या अनघा मोडक, खाकी वर्दीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मुंबईच्या रिता राठोड, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल ओतूर येथील डॉ. रश्‍मी घोलप व अहमदनगर येथील पत्रकार शिल्पा रसाळ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com