मनोविकारावरील औषधांच्या किमती कमी व्हाव्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - समाजात वाढणारे नैराश्‍याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यासाठी मानसिक आजारांच्या औषधांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. मनोरुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. 

मुंबई - समाजात वाढणारे नैराश्‍याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यासाठी मानसिक आजारांच्या औषधांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. मनोरुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. 

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त "डिप्रेशन लेट्‌स टॉक' अशी थीम होती. यावर ते बोलत होते. या वेळी आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील मनोरुग्णालयांमध्येही सुधारणा करण्याची आवश्‍यकता असून त्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तसेच मनोरुग्णांसाठी आवश्‍यक दवाखाने लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. यासाठी मनोविकारतज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याची समस्या त्यांनी मांडली. यावर उपाय म्हणून खासगी मनोविकारतज्ज्ञांची मदत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीर सिंघ यांनी राज्यातील मानसिक आरोग्य दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली. आर्थिक नियोजनात मानसिक आरोग्यासाठी अवघे 3 टक्के रक्कम खर्च करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. पूर्वी मनोरुग्णांचे प्रमाण 4 ते 5 टक्के होते. 2005 ते 2015 या काळात ते वाढून 18 टक्के झाल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. लोकांमधील एकटेपणा वाढत असल्याचे सांगताना पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 100 नंबरवर सर्वाधिक फोन हे वृद्धांचे येतात. एकटेपणामुळे सर्वाधिक फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोकळे बोलले पाहिजे आणि मुलांना त्यांच्या भाव भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. 

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणित उपचार पद्धती, आरोग्य पत्रिका, नैराश्‍य विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानसिक आरोग्यावर आधारित जिंगल लॉंच करण्यात आले. मानसिक आरोग्यावर आधारित कासव या डॉक्‍युमेंट्रीतील काही क्षणचित्रे दाखविण्यात आली. 

या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे, डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते. 

WHO च्या आकडेवारीनुसार 
-जगात 30 कोटी नागरिक नैराश्‍यग्रस्त असतात 
-भारतात 5.7 कोटी रुग्ण आहेत 
-महाराष्ट्रातील 3 टक्के लोक नैराश्‍यग्रस्त आहेत