महापौर बंगल्याला सरकारी अडथळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - मलबार हिल येथील बंगल्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसून, सरकारी स्तरावर त्याबाबत आडकाठी निर्माण होत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मलबार हिल येथीलच बंगला महापौरांना मिळावा, या मागणीवर शिवसेना ठाम आहे. मात्र, याबाबतचा पेच कायम आहे. 

मुंबई - मलबार हिल येथील बंगल्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसून, सरकारी स्तरावर त्याबाबत आडकाठी निर्माण होत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मलबार हिल येथीलच बंगला महापौरांना मिळावा, या मागणीवर शिवसेना ठाम आहे. मात्र, याबाबतचा पेच कायम आहे. 

महापौर पदाला साजेशे निवासस्थान शोधण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत; मात्र अद्याप निवासस्थानाचा पेच सुटलेला नाही. मलबार येथील बंगला महापौरांना मिळावा, या मागणीवर शिवसेना ठाम आहे; मात्र काहीच हालचाली होत नसल्याने शिवसेनेमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महिनाभरात पेच सोडवा अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. दादर येथील महापौर निवासस्थानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मलबार हिल येथील जल अभियंत्यांचा बंगला रिकामा करून तेथे महापौरांसाठी निवासस्थान व्हावे, अशी शिवसेनेची मागणी आहे; परंतु पालिकेचा हा बंगला रिकामा करण्यास सरकारने आडकाठी दर्शवली आहे. 

दीड वर्षापासून महापौरांच्या निवासस्थानाचे घोंगडे भिजत पडले आहे. पालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समिती, गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा मुद्दा वारंवार चर्चेला आला. अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यानंतर महापौरांसाठी बंगल्यांची यादीच पालिका आयुक्तांनी मागवली आहे. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. 

पालिका सभागृहात  खडाजंगीची शक्‍यता 
अधिकाऱ्यांकडून बंगल्यांची यादी मिळाल्यानंतर ती महापालिका सभेत मांडली जाईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. महिनाभरात निवासस्थानाचा निर्णय न झाल्यास आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना या प्रश्‍नावर आक्रमक झाल्याचे दिसते.

Web Title: Malabar Hill Mayor bungalow shiv sena