मराठ्यांचा पक्ष चेहर्याशिवाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम अशक्‍य

मुंबईसह, पुणे, सोलापूर, नाशिक या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहे...
मुंबई - ‘मराठा आरक्षण’ या प्रमुख मुद्द्यांसह विविध समस्या सोडवण्यासाठी मराठा समाजातील काही चेहरे, राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. एक प्रभावी चेहरा किंवा पुरेशी राजकीय बैठक नसल्याने या पक्षांचा निभाव लागेल की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर हे राजकारण मागेच पडेल, असे सांगण्यात येत आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघाले. या मोर्चांना प्रचंड प्रतिसादही मिळाला. या प्रतिसादाच्या आधारे ‘राष्ट्रीय मराठा पार्टी’ नावाचा पक्ष नुकताच स्थापन झाला. हा पक्ष मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहे. असे असले तरी या पक्षाचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेत निवडणुकीत उमेदवाराचा पक्षही पाहिला जात असल्याने मराठा समाजाच्या नावे मते मागणाऱ्यांना ते भारी पडेल. मुंबईत राहणाऱ्या मराठा समाजाचा जातीच्या राजकारणाशी फारसा संबंध येत नाही. तेव्हा मतदान करताना हा मुद्दा विचारात घेतला जाणार नसल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांनी माडले आहे. 

राज्यातील मूक मोर्चांमध्ये कोणाच्याही ध्यानीमनी नसताना उत्स्फूर्तपणे मराठा समाजाची ताकद दिसून आली. असाच प्रचंड प्रतिसाद मतपेटीतूनही या पक्षाला मिळतो का, अशी चाचपणी करण्यासाठी हा नवा पक्ष रिंगणात उतरला आहे का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. पक्षाला फारशा जागा जिंकता आल्या नाही, तरी लक्षवेधी मते मिळाल्यास कदाचित निकालानंतर त्यांचे बोलविते धनी पुढे येऊ शकतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पक्षाने जास्त मते घेतली तर राज्यातील कोणता प्रस्थापित पक्ष अडचणीत येऊ शकेल, याचेही आडाखे बांधले जात आहेत.

पक्षाची कमकुवत बाजू
राष्ट्रीय मराठा पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वच उमेदवार हे मतदारांसाठी अनोळखी आहेत. मतदारांना ओळखीचा चेहरा नसणे ही पक्षाची कमकुवत बाजू ठरणार आहे. अनोळखी उमेदवारांना किती मते मिळतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.