#MarathaKrantiMorcha सकल मराठा समाजाकडून नवी मुंबई बंदची हाक 

#MarathaKrantiMorcha  सकल मराठा समाजाकडून नवी मुंबई बंदची हाक 

नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 25) नवी मुंबई बंदची हाक दिली आहे. मंगळवारी एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यातर्फे एकदिवसीय बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पाठिंबा दिला असून, राज्यभरातील माथाडी कामगार उतरणार असल्याचे युनियनचे सचिव नरेंद्र पाटील यांनी सांगितले; मात्र आंदोलनातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद येथील गोदापात्रात काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान मराठा सकल समाज व मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून सरकारकडे मांडण्यात येणाऱ्या मागण्यांवर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती मुंबई व नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली. नवी मुंबईत होणाऱ्या बंदमध्ये माथाडी कामगार उतरणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले; मात्र आंदोलनाची झळ सर्वसामान्या नागरिकांना बसू नये, याकरिता शाळा, कॉलेज, रुग्णालये, फळ व भाजीपाला मार्केटसारख्या अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबवण्यासाठी सरकारने मराठा तरुणांसोबत बसून चर्चा करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

महामार्गावर पोलिसांची नजर 
राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शीव-पनवेल महामार्गावर आंदोलन होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिस सतर्क होते. महामार्गावर कोणत्याही शहराच्या ठिकाणी हिंसक आंदोलन होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच रस्त्यावर सुरू असणारी वाहतूक थांबू नये म्हणून पोलिसांची गस्तही या मार्गावर घालण्यात येत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com