#MarathaKrantiMorcha दगडफेक, गोळीबारामुळे तणाव

 #MarathaKrantiMorcha दगडफेक, गोळीबारामुळे तणाव

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग बुधवारी मुंबई परिसरातही जाणवली. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच पनवेलनजीकच्या कळंबोलीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांना, त्यांच्या वाहनांना तसेच पोलिस चौकीलाही लक्ष्य केले. त्यात काही पोलिसही जखमी झाले. काही भागांत रेल-रास्ता रोको, वाहनांवर दगडफेक व जाळपोळीच्या घटनाही घडल्याने दिवसभर तणाव होता. आयोजकांनी बंद मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतरही कळंबोलीत रात्री उशिरापर्यंत जमावाची हिंसक निदर्शने सुरू होती. राज्यातही अनेक भागांत या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने जनजीवनावर परिणाम झाला. आंदोलन शांत झाल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत आंदोलकांची धरपकड सुरू केली.

बंददरम्यान मुंबईत दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी लोकल, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू असल्याने जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही. शाळा-महाविद्यालये, सरकारी-खासगी कार्यालयेही सुरू होती.

बंददरम्यान सर्वाधिक हिंसाचार कळंबोलीत झाला. शीव-पनवेल महामार्गावर सकाळपासूनच आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्यांनी मुंबई-पुणे महामार्गावर जाणारी वाहतूकही रोखून धरली  होती. सकाळी ११च्या सुमारास पोलिस आंदोलकांशी चर्चा करण्यास गेले असता झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान दगडफेकीत झाले. त्यात काही पोलिस जखमी झाले. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांनाही आग लावली. पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच रबरी गोळ्या झाडल्या. त्यात काही आंदोलक जखमी झाले. सायंकाळी आयोजकांनी बंद मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही कळंबोलीत हिंसक आंदोलन सुरू होते.

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्‍टर ७ मधील डीमार्ट चौकात आंदोलकांनी चार दुचाकी आणि एक चार चाकी वाहनास आगी लावल्या. आंदोलकांनी या वेळी पोलिसांवरही दगडफेक करत तेथील पोलिस चौकीलाही आग लावली. आंदोलकांनी कोपरखैरणेतील पाण्याच्या टाकीच्या परिसरात काही निवासी इमारतींवर तसेच नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.

ठाणे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला; मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका येथे हिंसक वळण लागले. जमावाने केलेल्या हल्ल्यात काही पोलिस जखमी झाले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार तसेच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. नितीन कंपनी परिसरातही आंदोलकांनी पोलिसांवर  दगडफेक केली. त्यात दोन पोलिस जखमी झाले. 

नवी मुंबईला झळ...
रस्त्यांवरून हटवलेले आंदोलक नंतर महामार्गाच्या डावीकडील बाजूस जवाहर औद्योगिक वसाहत व शहरी भागात घुसले. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्‍टर ७, १३ व १५ मध्येही आंदोलनाची झळ बसली. सकाळी डी-मार्ट चौकात एक दुचाकी जाळल्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी आंदोलकांनी इमारतींमधून दगडफेकीचे चित्रण करणाऱ्या रहिवाशांवरही दगडफेक केली. तसेच इमारतीखालील वाहनांचीही तोडफोड केली. त्यानंतर डी-मार्ट चौकात चारचाकी पेटविण्यात आली. आंदोलकांनी तीन टाकी परिसरातील पोलिस चौकीलाही आग लावली. त्यानंतर आंदोलकांनी नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयावरही दगडफेक केली. 

मानखुर्दमध्ये बेस्ट जाळली
मानखुर्दमध्ये आज दुपारी रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी एका बेस्ट बसला आग लावली. मुंबईत आज हिंसाचाराची ही एकमेव मोठी घटना घडली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर मोहिते-पाटील विद्यालयासमोर हा प्रकार घडला. बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या व जळते बोळे टाकून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे बसची आसने व आतील सारा भाग जळून त्याची राखरांगोळी झाली. आग लावण्यापूर्वी प्रवाशांना उतरवून बसच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. उपस्थितांनी या प्रकाराची माहिती अग्निशमन दलाला दिल्यावर आग विझविण्यात आली. ५१७ क्रमांकाची कुर्ला आगाराची ही बस सांताक्रूझ ते नेरूळ या मार्गावर चालविली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com