#MarathaKrantiMorcha धग वाढली!

#MarathaKrantiMorcha धग वाढली!

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच पनवेलनजीकच्या कळंबोलीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांना, त्यांच्या वाहनांना तसेच पोलिस चौकीलाही लक्ष्य केले. काही भागांत रेल, रास्ता रोको, वाहनांवर दगडफेक व जाळपोळीच्या घटनाही घडल्या. आयोजकांनी बंद मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतही कळंबोलीत हिंसक जमावाची निदर्शने सुरू होती. त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी झाडलेल्या रबरी गोळ्यांमुळे काही आंदोलक जखमी झाले. नाशिकरोड व साताऱ्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले.

कळंबोली, ठाणे, साताऱ्यात हिंसक वळण 
मुंबईत बंददरम्यान दुकाने बंद ठेवण्यात आली असली, तरी लोकल-रस्ते वाहतूक सुरळीत सुरू असल्याने जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही. शाळा-महाविद्यालये, सरकारी-खासगी कार्यालयेही सुरू होती.

बंददरम्यान सर्वाधिक हिंसाचार कळंबोलीत झाला. शीव-पनवेल महामार्गावर सकाळपासूनच आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर जाणारी वाहतूकही रोखून धरली होती. सकाळी ११च्या सुमारास पोलिस आंदोलकांशी चर्चा करण्यास गेले असता झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेकीत झाले. त्यात काही पोलिस जखमी झाले. त्या वेळी आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांनाही आगी लावल्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी गोळ्या झाडल्या. 

ठाणे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला; मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या बंदने ठाण्यातील तीन हात नाका येथे हिंसक वळण घेतले. जमावाच्या हल्ल्यात काही पोलिस जखमी झाले. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

विष घेतलेल्याचा मृत्यू
औरंगाबाद - बंददरम्यान विष घेतलेल्या देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जगन्नाथ विश्‍वनाथ सोनवणे (वय ५७) यांचा घाटी रुग्णालयात बुधवारी पहाटे मृत्यू झाला. 

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून, त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर ‘हात जोडून साष्टांग दंडवत घालतो. परंतु, हिंसाचार थांबवा’. आम्ही सर्व अडथळे पार करून आरक्षण देऊ.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

आंदोलनाचे पडसाद
शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
वैजापूरचे आमदार भाऊराव पाटील चिकटगावकर यांचाही राजीनामा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com